अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्जमाफीचा याद्यांवर याद्या पाठविण्याचा पाढा सरकारकडून अजूनही सुरूच आहे. दरम्यान जिल्हा बँकेने सहकार आयुक्तांकडे मार्गदर्शन मागितल्यानंतर तब्बल ९१ अपात्र शेतक-यांची नावे वगळण्यात आली आहे. त्यामुळे कर्जमाफीचे ८६ लाख रूपये वाचले आहेत.योजनेच्या लाभासाठी जिल्हा बँकेने गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या पातळीवरील थकबाकीदार शेतक-यांच्या याद्या तयार करून सहकार विभागास तसेच मंत्रालयातील माहिती तंत्रज्ञान विभागास देण्यात आल्या. या याद्या अपलोड झाल्यानंतर मंजूर शेतक-यांची नावे ग्रीन लिस्टमध्ये, त्रुटी असलेल्या शेतक-यांची नावे यलो लिस्टमध्ये तर नामंजूर शेतक-यांची नावे रेड लिस्टमध्ये प्रसिद्ध केली जाणार होती. कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे वाटप झाल्यानंतरही अधिकृतपणे एकही यादी प्रसिद्ध झालेली नाही. ‘आपले सरकार’ पोर्टलवर योजनेच्या संकेतस्थळावर ग्रीन लिस्ट झळकल्या असल्या तरी याही याद्या बँकांमार्फत सहकार खात्याकडून अधिकृतपणे मिळालेल्या नाहीत.अहमदनगर जिल्हा बँकेच्या कर्जमाफी खात्यात ३ हजार ३४७ शेतकºयांचे १८ कोटी रूपये जमा झाले आहेत. पण गाव व नाव एवढीच ही यादी आहे. सेवा संस्थेच्या नावानिशी ही यादी नसल्याने यादीतील सभासद पात्र आहेत की नाहीत, नेमके पात्र सभासद कोणते? हे शोधायचे? ठरवायचे कसे? असा पेच निर्माण झाल्याने बँकेने सहकार आयुक्तांचे मार्गदर्शन मागविले. पण १५ दिवसात हे मार्गदर्शनदेखील न मिळाल्याने १८ कोटी रुपये पडून आहेत. मार्गदर्शन मागविल्यानंतर सहकार आयुक्तांकडून जिल्हा बँकेस यापूर्वी पाठविलेल्या ३३४७ शेतक-यांच्या यादीतून ९१ शेतक-यांची नावे वगळण्यास सांगण्यात आली आहेत. यात पती-पत्नी असे दोघेही लाभार्थी असल्याने व त्यांच्या कर्जमाफीची रक्कम दीड लाखांहून अधिक होत असल्याने त्यांची नावे वगळण्यास सांगण्यात आल्याचे समजते. पूर्वीच्या यादीप्रमाणे त्यांना रकमा वर्ग केल्या असत्या तर जिल्हा बँकेचे ८६ लाख रूपये चुकीच्या खात्यांमध्ये वर्ग होऊन त्याचा बँकेस आर्थिक फटका बसला असता.
याद्यांवर याद्या
दिवाळीच्या सुट्ट्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागाने जिल्हा बँक व सहकार खात्याकडून नव्याने पात्र शेतक-यांच्या याद्या मागविल्या. त्यानुसार पूर्णपणे नव्याने याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. आता सोमवारी पुन्हा ‘एक्सेल’फॉरमॅटमध्ये या याद्या मागविण्यात आल्या आहेत.
पदाधिका-यांची माहिती मागविली
सहकारी संस्थांच्या पदाधिका-यांसोबतच तेथील कर्मचा-यांच्याही याद्याही मागविण्यात आल्या आहेत. पदाधिका-यांच्या मातु:श्रीच्या नावासोबतच जन्मस्थळाची देखील माहिती मागविली आहे.