- डॉ. रवींद्र आंधळे ( अहमदनगर )
अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे जनजीवनाबरोबरच शेतीसह पशुधनही गारठले आहे़ पिकांची वाढ खुंटली असून, रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ शेतकऱ्यांनी यातून मार्ग काढण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे.रात्रीच्या वेळी थंडी वाढल्यामुळे जनावरांसह शेळ्या, छोटी करडे, कोकरे यांना निवारा करणे आवश्यक आहे.
करडांची संख्या जास्त असल्यास गोठ्यात करडांना ऊब लागेल अशा उंचीवर २०० ते ५०० वॅटचा बल्ब लावावा़ सकाळी गवतावर दव पडले असल्यास जनावरांना उशिराने चारण्यास न्यावे़ थंडीचे प्रमाण जास्त वाढल्यास गायी, म्हशीच्या पाठीवर अंग झाकेल असे गोणपट बांधावेत़ गोठा ऊबदार राहण्यासाठी शेकोटी पेटवावी.
हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरोपायरिफॉस २५ टक्के प्रवाही २५ मि.लि. किंवा प्रोफे नोफॉस ४० टक्के प्रवाही २५ लिटर प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी़ ज्वारीवर मावा व चिकट्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३४ टक्के ५०० मि.लि. किंवा मिथल डिमेटॉन २५ टक्के ४०० मि.लि. ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रतिहेक्टरी फवारणी करावी़ भेंडीवर फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ४ टक्के किंवा प्रोफेनॉफॉस १० मि.लि. किंवा डेल्टामेथ्रीन ५ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणावर फवारणी करावी़
कांद्यावर करपा व फूल नियंत्रणासाठी क्लोरोथॅलोनील २५ गॅ्रम किंवा मँकोझेब २५ गॅ्रम किंवा कार्बेन्डझिम १० गॅ्रम अधिक कर्बोसल्फान १० मि.लि. किंवा डेल्टामेथ्रीन ५ मि.लि. किंवा फिप्रोनिल १५ मि.लि. अधिक स्टिकर १० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. याशिवाय इतर पिकांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
(लेखक हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे हवामान विभागाचे प्रमुख आहेत.)