सुदाम देशमुखअहमदनगर : पेरलेले बियाणे बोगस आहेत, हे तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करू न शकल्याने शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात बियाणांबाबतच्या केवळ ३६ टक्केच तक्रारी निघाल्याचे दिसते आहे.बोगस बियाणे दिली म्हणून शेतकºयांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र बहुतांश प्रकरणात शेतकरी व बियाणे उत्पादक कंपन्या यांच्यामध्ये तडजोडी झाल्याचे निकालावरून दिसून येते. सर्वच कंपन्यांची कार्यालये जिल्ह्याबाहेर असल्याने त्यांच्या प्रतिनिधींची अनुपस्थिती असल्याने सुनावणीमध्येही अडचणी येत आहेत. ग्राहक मंचाच्या संकेतस्थळावर तीन वर्षात १९ तक्रारी दाखल असून त्यामध्ये केवळ सातच तक्रारी निकालात निघाल्याचे दिसून आले आहे.
शेतकरी नामांकित कंपन्यांकडून बियाणे घेतात. मात्र ते बियाणे शेतात उगवले नाही तर शेतकºयांचे आर्थिक नुकसान होते. यामुळे शेतकरी अनेकवेळा कर्जबाजारीही होतात. काही शेतकरी कंपनीविरुद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल करतात. मात्र बियाणे बोगस असल्याचे पुरावे काय द्यायचे, असा प्रश्न शेतकºयांना पडतो. जे बियाणे विकत घेतलेले असते ते बियाणे सर्व पेरलेले असते. केवळ संबंधित कंपनीकडून बियाणे घेतल्याची पावतीही युक्तीवाद करताना अपुरी पडते. बियाणे सकस व दर्जेदार असल्याचे पुरावे कंपनीकडून केले जातात. यामध्ये शेतकºयांना दोन पावले मागेच सरकावे लागते. बहुतांश तक्रारींमध्ये कंपनी बियाणे देण्याचे कबूल करते. त्यामुळे तक्रारदार शेतकरी व कंपनी यांच्यामध्ये तडजोड होते. त्यामुळे तक्रारी फाईलबंद होतात.
कंपनीचा वकील अनेकवेळा वेळेवर उपस्थित राहत नाही. त्यामुळे तारखा लांबणीवर पडतात. परिणामी अनेक शेतकºयांच्या तक्रारी निकालात निघण्याचे प्रमाण केवळ ३६ टक्केच असल्याचे दिसून येते.अशी फेटाळली जाते तक्रार
अनेक तक्रारी निकालात निघतात, मात्र त्यात शेतकºयाला नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी निराश होतात. एका तक्रारीत बियाणे बोगस असल्याचे कुठेही सिद्ध झाले नाही. त्यातील युक्तीवाद असा. तक्रारदारास दिलेले मूग बियाणे हे उत्पादकीय दूषित आहेत असे कुठेही म्हटलेले नाही. कंपनीने तक्रारदारास ज्या गुणवत्तेची बियाणे दिलेली आहेत त्याच गुणवत्तेचे मुगाचे पीक आलेले आहे. म्हणजेच बियाणाच्या गुुणवत्तेबद्दल तक्रार नाही. बियाणाची उगवण अतिशय चांगल्या प्रकारे झालेली होती. फुलधारणा व्यवस्थित झालेली होती. त्यास शेंगाही व्यवस्थित आलेल्या होत्या. वास्तविक मूग पिकास फुलधारणा होणे, शेंगा येणे, शेंगा बारीक, आखुड, मोठ्या असणे, शेंगा कमी जास्त प्रमाणात लागणे हे पूर्णपणे हवामान, तापमान, वातावरणातील बदल, जमिनीचा पोत, खते, औषधे, पाण्याचा नियमितपणा इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते. तक्रारदाराने तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीस हाताशी धरुन खोट्या मजकुराचा अहवाल तयार करुन त्याआधारे खोट्या मजकुराचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. तक्रारदाराचे मूग पिकाचे ६० टक्के किंवा त्यावर नुकसान झालेले नाही. सदरची तक्रार ही खर्चासह रद्द करण्यात यावी.