भाऊसाहेब येवलेराहुरी : सहकारी साखर कारखानदारीच्या इतिहासात प्रथमच शेतक-यांना जाहीर केलेल्या भावापेक्षा कमी भाव मिळू लागला आहे. कारखान्यांनी २३०० रूपये टनावरून भाव २१०० रूपये टन केला आहे. राहुरी तालुक्यातील ऊस मार्च अखेरीस संपत असून तीन लाख टन ऊस उभा असल्याची अधिकृृत आकडेवारी समोर आली आहे.राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद शुगरने मंगळवारपर्यंत २ लाख ६२ हजार टन उसाचे गाळप केले. कारखान्याचा सरासरी उतारा १०़२५ टक्के आहे. तनपुरे सहकारी कारखान्याने १ लाख २५ हजार ८८१ टन उसाचे गाळप केले असून सरासरी उतारा १०़८० टक्के आहे.प्रसाद व तनपुरे कारखान्याने सुरूवातीस २३०० रूपये प्रतिटन उसाला भाव दिला. मात्र साखरेचे भाव कोसळल्याचे कारण सांगत दोन्ही साखर कारखान्यांनी २१०० रूपये टन भाव उसाला भाव दिला आहे. साखरेचे भाव घसरल्यामुळे शेतक-यांना प्रतिटन २०० रूपयांचा फटका बसला आहे. कारखान्यांनी भाव जाहीर केल्यानंतर त्यामध्ये घट होण्याची ही सहकारी चळवळीतील पहिलीच घटना आहे.यंदा उसाला तीन हजार रूपये टन भाव मिळेल, अशी शेतक-यांना अपेक्षा होती़ गेल्या दोन वर्षात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतक-यांनी हक्काचे पीक म्हणून उसाला प्राधान्य दिले. खते,औषधे,मजुरी याचे दर वाढले असतांना उसाला कमी भाव मिळत असल्याने ऊस शेती संकटात आली आहे. त्यातच ऊस तोडणी कामगारांनी शेतक-यांकडून जबरदस्तीने दक्षिणेच्या नावाखाली लूट सुरू केली आहे.साखरेच्या भावानुसार दर देण्याची भूमिका जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी घेतली आहे. केंद्र सरकारने १७ टक्के साखर व्यापा-यांना विकून उर्वरित साखर गोदामातच ठेवण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे साखरेचे दर वाढण्याची अपेक्षा आहे.
साखर कारखाने सुरू होऊन तीन साडेतीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. केंद्र सरकारने सुरूवातीलाच साखरेबाबत निर्बंध आणणे गरजेचे होते. त्याचा चांगला फायदा शेतक-यांना झाला असता. सरकारच्या धोरणामुळे काही प्रमाणात साखरेचे दर वाढतील़ साखरेचे दर कमी झाल्याने भाव कमी करावे लागले.-प्राजक्त तनपुरे, अध्यक्ष, प्रसाद शुगर.