संगमनेर : अयोध्येत गेलो तरी प्रभू श्रीरामचंद्रांकडे अवकाळीचे संकट टळो, अशीच प्रार्थना केली. शेतकऱ्यांकडे सरकारचे कुठेही दुर्लक्ष झालेले नाही. आता जे टीका करतात त्यांच्यात राम राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या टीकेला महत्व देण्याचे कारण नाही. असे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले. मंगळवारी (दि. ११) महसूलमंत्री विखे यांनी तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना भेट दिली, तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यापूर्वी संगमनेर तालुक्यात गारपीट आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना युती सरकारने ६ कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिली आहे. नव्याने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास शासन कुठेही कमी पडणार नाही. या संकटात सरकार तुमच्या सोबत आहे. राज्य सरकारने आजपर्यंत झालेल्या सर्वच नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. त्यासाठी नियम आणि निकष सुध्दा बदलले. शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्यासाठी असलेली मर्यादा सुध्दा वाढवली आहे. आता मदतीसाठी सततचा पाऊस सुध्दा ग्राह्य धरण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा अनुदानाच्या बाबतीत नव्याने काही सूचना दिल्या आहेत. असेही मंत्री विखे पाटील म्हणाले.