जामखेड : जनावरे चारण्यासाठी प्रल्हाद वराट गेले असता त्यांच्यावर रानडुक्करांने हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.प्रल्हाद कानिफनाथ वराट (वय ५०) हे रविवार रोजी आपली जनावरे चारण्यासाठी शेतात गेले होते. साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका झाडाझुडपाच्या जाळीतून दहा ते पंधरा डुक्करांचा कळपाने हल्ला केला. त्यामुळे त्यांच्या मांडीला व हनुवटीवर मोठ्या प्रमाणावर जखम झाली. यामुळे ते रक्तबंबाळ होऊन जागीच चक्कर येऊन पडले. शेजारी असलेल्या लोकांनी आरडाओरडा केला. त्यामुळे रानडुक्करांनी तेथून पळ काढला. तेथील शेतक-यांनी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात जखमी प्रल्हाद वराट यांना उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी जखमीवर तातडीने उपचार केले. सध्या ते ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. दोन महिन्यांपूर्वी साकत ग्रामपंचायत सदस्य सोजरबाई वराट यांच्यावर साकत येथे रानडुक्करांनी हल्ला केला होता. त्यात त्यांचा खुबा मोडला होता. त्या अद्यापही जाग्यावरच पडून आहेत. या घटनेनंतर आज रविवारी पुन्हा शेतक-यांवर रानडुक्करांच्या जीवघेण्या हल्ल्यामुळे भयभीत वातावरण साकत व परिसरात निर्माण झाले आहे. वनविभागाने रानडुक्करांचा बंदोबस्त करावा बंदोबस्त न केल्यास ग्रामस्थांतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा पं. स.चे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर यांनी दिला आहे.
रानडुक्कराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 4:42 PM