कर्जत : कर्जत तालुक्यातील खातगाव शिवारात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले. मात्र, हे पंचनामे बनावट व खोटे झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाली. या प्रकाराची चौकशी करावी व नुकसान झालेल्या प्रमाणात नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी खातगाव येथील शेतकऱ्यांनी कर्जत तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या पावसाळ्यात कर्जत तालुक्यातील विविध भागांत समाधानकारक पाऊस झाला. कर्जत मंडळात ८३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कर्जत तालुक्यातील सर्व पिकांचे पंचनामे झाले. खातगाव येथे पंचनामे झाले. परंतु, ते केवळ कागदावरच राहिले. पंचनाम्यासाठी आलेल्या पथकाने शेतकऱ्यांना बोलावून आवश्यक कागद घेतले. परंतु, ते शेतकऱ्यांच्या शेतात गेले नाहीत. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज आला नाही. परिणामी शेतकऱ्यांना तुटपुंजी नुकसान भरपाई मिळाली. काही शेतकरी तर नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. खातगाव शिवारातील पिकांचे पंचनामे नव्याने करावेत व सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी खातगाव येथील शेतकऱ्यांनी कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळेे यांच्याकडे केली आहे.
निवेदनावर सरपंच अर्जुन आटोळे, उपसरपंच उषा शिंदे, महेश ठाणगे, मच्छिंद्र गाढवे, महादेव गावडे राजाराम वाघ, मच्छिंद्र गायकवाड, देवराव शिंदे, नामदेव पाटोळे, अर्जुन तोरडमल, सुनिता फणसे, नानासाहेब रोटे, हनुमंत खाटमोडे, अंकुश पिटेकर, सत्तार शेख, बाळासाहेब येडे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.