आदिवासी भागात भात हे मुख्य पीक घेतले जात असते. यात शेतकरी पारंपरिक वाणाबरोबरच नवीन वानांनाही प्राधान्य देत आहे.
अनेक ठिकाणी भात लागवड पद्धतीने घेतले जात असते. यासाठी रोपवाटिका तयार करण्यात येते. या रोपवटिकेची नांगरणी करून ती भाजून घेतली जाते. रोहिणी नक्षत्राच्या अगोदर हा शेतकरी वर्ग भात रोपांच्या तयारीला लागत असतात. काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपला असताना आता हा बळीराजा कामाला लागला आहे. ज्या भात खाचरात लागवड करायची आहे त्याची एक नांगरणी करून ठेवण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. खरीप हंगामाच्या जोरदार तयारीला लागलेला आहे. आदिवासी पट्ट्यातील बहुतेक गावांमध्ये मान्सून पूर्व शेतीच्या कामाची तयारी वेग धरू लागली आहे. कृषी निविष्ठा पुरवणारे कृषी सेवा केंद्र व निविष्ठा भांडार बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. बियाणे, औषधे, खते यांची जमवाजमव करून ठेवणे कठीण झाले आहे. लॉकडाऊननंतर तुंबळ गर्दी कृषी सेवा केंद्रांवर होण्याचा धोका वाढला आहे. शेतकऱ्याला येणाऱ्या हंगामाची आस लागून राहिलेली आहे.