श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : पोल्ट्री व्यवसायाच्या बांधकामासाठी अधिकृतरित्या खरेदी केलेली शेतकऱ्याची १३ ब्रास वाळू पळविणाऱ्या चोराला पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले. आरोपीचे नाव अक्षय भिमराव यादव (वय २२, शिरसगाव, ता.श्रीरामपूर) असे आहे. त्याच्याकडून एक पीकअप गाडी तसेच चोरीस गेलेली वाळू पोलिसांनी जप्त केली. अन्य एका साथीदारासमवेत त्याने चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली.
गोंधवणी येथील संजय तुकाराम कुळे (वय ४७) यांनी पोल्ट्रीच्या बांधकामासाठी २० ब्रास वाळू खरेदी केली होती. २२ जुलैला रात्रीच्या वेळी अज्ञातांनी शेतातून यातील १३ ब्रास वाळू वाहनात भरून पळवून नेली होती. याप्रकरणी कुदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते.
गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून शिरसगाव शिवारात वाळू असल्याची खात्री पोलिसांना मिळाली. आरोपी यादव याच्या घराजवळ पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे, रघुवीर कारखेले, राहुल नरवडे, गौतम लगड, गणेश गावडे, रमिझराजा अत्तार, मच्छिंद्र कातखडे, संभाजी खरात यांनी गुन्ह्याचा तपास केला.