- योगेश गुंड अहमदनगर : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय हुतात्मा एक्स्प्रेसमधील हजारो प्रवाशांना रविवारी सकाळी अहमदनगर तालुक्यातील देहरे शिवारात आला. रेल्वे रूळ तुटलेले पाहताच शेतक-याने प्रसंगावधान राखत लाल कापड दाखवून भरधाव जाणा-या रेल्वेला थांबण्यास भाग पाडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.रविवारी सकाळी नऊ वाजता भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस देहरे- विळद परिसरातून जात होती. त्याच वेळी शेतात पाणी देण्यासाठी जाणारे शेतकरी रामदास बापूराव थोरात यांना विळद-वांबोरीच्या दरम्यान रेल्वेचा रूळ तुटल्याचे निदर्शनास आले. समोरच्या दिशेने रेल्वे येत असल्याचे त्यांनी पाहिले. क्षणाचाही विलंब न करता थोरात यांनी अंगातील लाल रंगाचे बनियन काढले व ते गाडीच्या दिशेने हातात फडकवत धोक्याचा इशारा दिला.त्यानंतर, गाडी थांबल्यावर थोरात यांनी रेल्वेचा रूळ पुढे तुटल्याचे सांगितले. चालकाने व इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी खातरजमा केली. त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांना माहिती कळविली. रेल्वे कर्मचाºयांनी काही वेळात येऊन रेल्वे रूळ तात्पुरता दुरुस्त केला. त्यानंतर गाडी मार्गस्थ झाली.रेल्वेमार्गात केला होता बदलभुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसचा नियमित मार्ग भुसावळ-मनमाड-नाशिक-कल्याण-पनवेल-लोणावळा-पुणे असा आहे. मात्र, रविवारी काही तांत्रिक कारणास्तव रेल्वेच्या मार्गात भुसावळ-मनमाड-कोपरगाव-अहमदनगर-दौंड-पुणे असा बदल करण्यात आला होता.>काळजाचा ठोका चुकलातुटलेल्या रुळापासून गाडी आधीच थांबावी, यासाठी थोरात गाडीच्या दिशेने धावत होते. काळजाचा ठोका चुकावा, असा तो क्षण होता. त्यांना दमही लागला होता. लाल कापड हातात धरून कोणीतरी फडकवित असल्याचे रेल्वेच्या चालकाच्या लक्षात आहे. चालकाला धोक्याची सूचना लक्षात येताच त्याने त्वरित ब्रेक लावून गाडी थांबविली.
शेतकऱ्यामुळे वाचले हजारो रेल्वे प्रवाशांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 6:02 AM