अहमदनगर : जिल्ह्यातील साखर कारखानदारांचा २३०० रुपये दराचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर आजपासून (गुरुवार, दि. ७) लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोरच शेतकरी संघर्ष समितीने आत्मक्लेश आंदोलन सुरु केले आहे. तर नगर, औरंगाबाद, बीड, जालना, सोलापूर आदी जिल्ह्यातून आलेल्या २१ शेतक-यांनी विखे यांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. संगमनेर लोणी रस्त्यावर विखे यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरु करण्यात आले.आंदोलकांना अटक केल्यास अन्नत्यागासह पाणीही वर्ज्य करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले.लोणी हे गाव विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे आहे. त्यामुळे लोणी ग्रामस्थांनी २०१४ साली ग्रामसभेने घेतलेल्या ठरावाचा हवाला देत शेतक-यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला विरोध दर्शविला होता. जिल्हा प्रशासनानेही लोणी येथे आंदोलन करण्यास परवानगी नाकारली होती. त्या पार्श्वभूमीवर लोणीतील आंदोलन चिघळण्याची शक्यता गृहित धरुन पोलिसांचा मोठा फौजफाटा लोणीत दाखल झाला आहे.
सकाळी ९ वाजता आत्मक्लेश आंदोलन सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. तथापि, हे आंदोलन सकाळी १ वाजता सुरु करण्यात आले. ११ वाजल्यापासून शेतकरी संघर्ष समितीचे नेते लोणी येथे दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना डॉ. अजित नवले म्हणाले, आत्मक्लेश आंदोलनाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. तरीही आम्ही आत्मक्लेश आंदोलन करणारच आहोत. या आंदोलनात आम्ही पाणीही घेणार नाही. आम्हाला आंदोलनापासून कोणीही रोखू शकत नाही. हे आंदोलन कोणा व्यक्तीविरोधात नसून सरकारविरोधात आहे. आमचे आंदोलन चिरडण्याचा पोलिसांचा डाव आहे.