कोपरगाव : राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानाच्या महाडीबीटी योजनेअंतर्गत २०२१ - २२ या आर्थिक वर्षासाठी अर्ज स्वीकारण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे. यात शेतकऱ्यांची एकदाच अर्ज करून विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करावेत, असे आवाहन कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी केले आहे.
आढाव म्हणाले, राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित सर्व प्रकारची अवजारे, पॉवर टिलर (छोटा ट्रॅक्टर), कांदा चाळ, शेततळे, शेततळे अस्तरीकरण अशा विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावयाचा आहे. ही नोंदणी करताना गावातील सेतू कार्यालयात अर्ज करता येतो. या अर्जासाठी शेतकऱ्याने सातबारा उतारा, खाते उतारा, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांक महत्त्वाचा आहे. अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती या वर्गातील लाभार्थ्यांचा जातीचा दाखला आदी कागदपत्र आवश्यक आहे.
विशेष म्हणजे २०२० - २०२१ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी या योजनेत ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. त्यांना आपल्या मागणीत बदल करावयाचा असल्यास तशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक तसेच मंडल कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून योजनेत सहभाग घ्यावा. असेही आढाव यांनी शेवटी म्हटले आहे.