शिर्डी : विरोधकांचा भारत बंद हा राजकीय फार्स आहे. देशातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले पाहिजे, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
शिर्डी येथे भाजपाचे शिवाजी गोंदकर यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या पदग्रहण समारंभानंतर विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, अभय शेळके, कैलास कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, विजय जगताप, सुजित गोंदकर आदी उपस्थित होते. विखे म्हणाले, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विधेयक आणले आहे. नवीन कृषी कायदा शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविणारा आहे. पूर्वी सत्तेत असताना या कायद्याचे समर्थन करणारे आज राजकारणासाठी रस्त्यावर उतरले आहेत. बाजार समित्यांची मक्तेदारी संपली पाहिजे. शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, अशी त्यावेळी त्यांचीही भूमिका होती. परंतु, आता तीच मंडळी या कायद्याला विरोध करीत आहे. आंदोलनाला असलेला पाठिंबा ही त्यांची राजकीय भूमिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीच आता केंद्राच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरावे, असे आवाहन विखे यांनी केले.