राहुरी : मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे या मागणीसाठी राहुरी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. वरिष्ठांशी चर्चा करून येत्या आठ-दहा दिवसांत पाणी सोडण्याबाबत मुळा पाटबंधारे विभागातर्फे लेखी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मुळा धरणात पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाचे कारण देऊन पाटबंधारे विभागाने सोडलेले पाणी बंद केले. परंतु लाभक्षेत्रात म्हणावा असा पाऊस झालेला नाही. कोल्हापूर पध्दतीचे बंधारे कोरडेठाक असल्याने शेतीचे, तसेच पिण्याच्या पाण्याचे हाल आहेत. त्यामुळे त्वरित पाणी सोडावे या मागणीसाठी बाळासाहेब पेरणे व उत्तमराव म्हसे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून दहा दिवसात पाठपुरावा केला जाईल, असे लेखी आश्वासन मुळा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप नवलाखे यांनी दिले़ मुळा नदीपात्रात असलेले चार कोल्हापूर पध्दतीचे बंधारे वर्षातून तिनदा भरून देण्यात यावे, अशी मागणी उत्तमराव म्हसे यांनी केली़ यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल, असे नवलाखे यांनी स्पष्ट केले़राजेंद्र शेटे, गंगाधर पेरणे, प्रमोद हारदे, जनार्दन पेरणे, गोरक्षनाथ खडके, रामचंद्र पेरणे, गोरक्षनाथ तारडे, कानिफनाथ धसाळ, बाळासाहेब धसाळ, शंकर पेरणे, आण्णासाहेब धसाळ, दत्तात्रय घोलप, जयवंता गुडधे, किरण जाधव, संभाजी जाधव, विलास सैंदोरे, प्रदीप नाईक, अण्णासाहेब आंधळे, सतीष जाधव आदी यावेळी उपस्थित होते़ माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी मोबाईलवरून आंदोलकांशी व अधिकाऱ्यांशी चर्चा केली़(तालुका प्रतिनिधी)
मुळा आवर्तनासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या
By admin | Published: August 29, 2014 1:01 AM