अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असून, रविवारी रात्री पारनेर तालुक्यातील गारगुंडी येथे व सोमवारी दुपारी नगर तालुक्यातील कापूरवाडी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. गेल्या काही दिवसातील नगर तालुक्यातील ही पाचवी आत्महत्या आहे.रविवारी सायंकाळी उशीरा पारनेर तालुक्यातील गारगुंडी येथील नितीन प्रकाश झावरे (वय ३८) या शेतकऱ्याने घरामधील पत्राच्या अँगला फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. नितीन हा गावामध्येच पत्नीसह शेती करून आपला उदरनिर्वाह करत होता. रविवारी दिवसभर तो गावामध्येच होता. तो सायंकाळी उशीरा घरी आला. त्यानंतर पत्नी मंदीरामध्ये नैवद्य ठेवण्यासाठी गेली होती. ती परत आल्यानंतर दरवाजा वाजविला तरीही आतून काहीच आवाज आला नाही. नंतर तिने शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा तोडला. तर घरामध्ये पत्र्याच्या अँगलला नितीन याने फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. ते पाहून पत्नीने एकच हंबरडा फोडला. माजी सरपंच अंकुश भास्कर झावरे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.नगर तालुक्यातील कापूरवाडी येथील दत्तवाडी परिसरातील महेश प्रभाकर कराळे या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. आगडगाव रोडवरील एका झाडाला महेश यांनी गळफास घेतला. ते पदवीधर होते. एका महिन्यात नगर तालुक्यातील पाच शेतकऱ्यानी आत्महत्या केलेल्या घटना घडल्या आहेत. आत्महत्यांचे हे सत्र सुरुच असल्यामुळे नगर जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या
सातत्याने दुष्काळी परिस्थिती, शेतमालाला भाव नसणे यामुळे शेतकऱ्यांच्या हाती उत्पन्न येत नाही. त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या संख्या वाढत आहे. आर्थिक अडचणीमुळेच शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे गावकरी सांगत आहेत. नापिकीमुळे आणि शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे स्वप्नभंग झालेले नितीन झावरे गेल्या काही दिवसांपासून निराश होते, त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.