अकोले : अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मधुकर पिचड व ऊस दर आंदोलनाचा इशारा दिलेल्या आंदोलकांची कारखाना कार्यस्थळावर दराबाबत बैठक झाली. मात्र ही चर्चा फिस्कटल्याने शनिवारी कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकण्यावर आंदोेलक ठाम आहेत.उसाला पहिली उचल प्रतिटन २५५० रुपये मिळण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि.१६) ‘अगस्ती’च्या गव्हाणीत उड्या टाकण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी दिला आहे. पिचड यांनी सावंतांसह आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले होते. चर्चेदरम्यान आर्थिक कारणे सांगत उसाला २३०० रुपयांपेक्षा अधिक भाव देता देणार नाही, असे पिचड व संचालक मंडळाने स्पष्ट केले.‘सबबी सांगू नका. कोल्हापूर भागातील साखर कारखान्यांना भाव देता येतो, मग अगस्तीला भाव का देता येत नाही? साखर कारखाना बंद न पाडता आंदोलन कसे करायचे?, हे आम्हाला माहीत आहे. २५५० रुपये पहिली उचल ऊस उत्पादकांना द्या’अशी भूमिका सावंत यांनी मांडली. कारखाना त्यास तयार न झाल्याने शनिवारी गव्हाणीत उड्या घेण्याच्या आंदोलनावर शेतकरी ठाम असून शेतकरी हिताची चाड असेल तर अगस्तीच्या संचालकांनी ऊस भावाच्या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनास सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन आंदोलकांनी यावेळी केले.अध्यक्ष पिचड, उपाध्यक्ष सीताराम गायकर व संचालक मंडळासमवेत झालेल्या चर्चेत आंदोलनाचे नेते सावंत यांच्यासह बबन नवले, पाटीलबुवा सावंत, चंद्रकांत नेहे, नामदेव आरोटे, पांडुरंग नवले, मनोहर मालुंजकर, प्रकाश मालुंजकर, बाळासाहेब मालुंजकर, अरुण आरोटे या शेतकºयांनी भाग घेतला. दरम्यान मंगळवार ते गुरुवार असे तीन दिवस तालुक्यातील प्रवरा-आढळा-मुळा खोºयातील गावांमधे शेतकरी जागृती सभा झाल्या. अकोलेनंतर संगमनेर व लोणीतही आंदोलने पेटणार आहेत.
कारखाना बंद पाडून त्याचे खापर आमच्या माथी मारण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र कारखाना बंद पडू न देता आंदोलन कसे करायच हे आम्हाला माहीत आहे. कारखान्याचे काही संचालक राजीनामे देऊन आंदोलनात सहभागी होण्याच्या मानसिकतेचे आहेत. या संचालकांनी अगस्ती सुरू करण्यासाठी आपल्या डोक्यावर वैयक्तिक कर्ज घेतल्याने अडचण झाली आहे. मात्र वेळ पडल्यास ते आंदोलनात उतरतील, असा विश्वास आहे. २५५० रुपये पहिली उचल मिळाल्याशिवाय आता आंदोलन थांबणार नाही.-दशरथ सावंत, माजी प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.