श्रीगोंदा : रब्बीच्या दुस-या आवर्तनातून वंचित राहिलेल्या वितरिका १० ते १४ यांना आणि घोडेगाव तलावाला २० एप्रिल २०१८ च्या दरम्यान प्रथम प्राधान्याने पाणी दिल्यानंतरच कर्जत तालुक्याला पाणी देण्याचा निर्णय झाल्यानंतर सर्वपक्षीय आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती कुकडी पाटपाणी कृती समितीचे निमंत्रक प्रा. तुकाराम दरेकर यांनी दिली.वितरिका क्रमांक १० ते १४ खालील शेतक-यांनी सोमवारी कुकडी पाटबंधारे विभागाच्या श्रीगोंदा येथील कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता. कुकडीच्या नारायणगाव विभागाने ३०० ते ४०० क्यूसेक पाणी घेतल्यामुळे श्रीगोंद्याला कमी पाणी मिळत होते. त्यामुळे १० ते १४ वितरिकांवरील सिंचन आणि घोडेगाव तलावात पाणी सोडता आले नाही. आता जे पाणी येत आहे ते लेंडी नाला आणि घोडेगाव तलावात सोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.प्रा.तुकाराम दरेकर यांनी अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्याशी आणि बाबासाहेब भोस यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की, आता मिळणारे पाणी घोडेगाव तलाव आणि लेंडी नाल्यात सोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यांनतर १३ दिवसांनी म्हणजे १५ एप्रिल रोजी सुटणा-या तिस-या आवर्तनातून वितरिका १० ते १४ चे सिंचन व घोडेगाव तलावात प्रथम प्राधान्याने म्हणजे २० एप्रिल २०१८ च्या दरम्यान पाणी दिले जाणार आहे. त्यानंतरच किलोमीटर १६५ च्या खाली पाणी जाणार आहे, असाही निर्णय जाहीर करण्यात आला. प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ते घेऊन तयार केलेल्या पाटपाणी कृती समितीची बैठक १६ एप्रिल २०१८ रोजी घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे, असेही प्रा. दरेकर म्हणाले.आंदोलनात बाबासाहेब भोस, मनोहर पोटे, प्रशांत दरेकर, देवराव वाकडे, राजेंद्र म्हस्के, अनिल ठवाळ, मिलिंद दरेकर, शिवप्रसाद उबाळे, शरद जमदाडे, सतीश मखरे, विश्वास भुजबळ, महादेव लाळगे, देवीचंद भुजबळ, एम.टी. दरेकर,आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. माजी मंत्री बबनराव पाचपुते व घन:शाम शेलार यांनी भेट दिली. कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी हे उपस्थित होते. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार आणि त्यांच्या पोलीस कर्मचा-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
श्रीगोंदा कुकडी कार्यालयावर शेतक-यांचा पाण्यासाठी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 6:06 PM