दहीगावने : कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरीही अनेक शेतकऱ्यांच्या उसाला तोड आली नाही. त्यामुळे शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या चांगलेच धास्तावले आहेत. ऊस तुटून जाण्यास उशीर झाला तर एकरी उत्पादनात खूप मोठी घट होईल.
शिवाय रब्बी हंगामातील पिकांनाही विलंब होत आहे. त्यामुळे ऊसतोड मिळावी, यासाठी शेतकरी कारखाना व्यवस्थापनाकडे चकरा मारत आहेत.
शहर टाकळी व परिसर मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकक्षेत येतो. शिवाय वृद्धेश्वर, गंगामाई, प्रवरा, केदारेश्वर, मुळा आदी कारखान्यांनाही येथील शेतकरी काही प्रमाणात ऊस देत असतात. मागील वर्षीच्या चांगल्या पर्जन्यमानामुळे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे पुढील दोन वर्ष शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने येथील शेतकऱ्यांनी ऊस पिकाला अधिक प्राधान्य दिले. त्यामुळे ऊस क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे यावर्षी या परिसरात ऊसतोडणीसाठी मजुरांची संख्या वाढवणे अपेक्षित होते; मात्र तसे न झाल्याने ऊस तुटण्यास उशीर होत आहे. त्यामुळे ऊसतोड टोळ्यांची संख्या वाढवून तातडीने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
---
काही शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी तर काहींनी बियाण्यासाठी ऊस विकून खोडवा उसात अंतरपीक तर काहींनी नवीन पिके घेतली; मात्र कारखान्याशी केलेला करार आणि सभासदत्वाशी बांधील अनेकांनी मातृसंस्था असलेल्या कारखान्यात ऊस पाठवायचा, या उद्देशाने ऊस ठेवलेला आहे; मात्र ऊस जायला उशीर होत असल्याने आता हेही शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
-वैभव गवारे,
माजी सरपंच, शहर टाकळी.
----
ऊस नोंदी घेतानाच गडबड
ऊस लागवडीनंतर कारखान्याकडे लागवड नोंदी दिल्या जातात. तेव्हा तारखा मागेपुढे झाल्या की त्याचा परिणाम ऊस तोडणीच्या वेळी दिसून येतो. आपल्यानंतर लागवड झालेल्या उसाला अगोदर तोड आली की कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये वादावादी होते. त्यामुळे ऊस लागवडीनंतर नोंदी घेण्याचे काम पारदर्शी व्हायला हवे, असे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.