दहिगावने : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी वेळेवर ऊसतोड मिळत नसल्याने चांगलेच धास्तावले आहेत. १७ महिन्यांपेक्षाही जास्त महिन्याचे पीक अजूनही शेतात उभे असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तोड मिळावी यासाठी शेतकरी प्रयत्नशील झाले आहेत.
यात विशेष बाब म्हणजे वृद्धेश्वर कारखान्याला नियमित ऊस देणाऱ्यांचाही ऊस राहिलेला आहे. परंतु, ऊसतोड मजूरच नसल्याने अनेक शेतकरी धास्तावले आहेत. असे शेतकरी आता ज्ञानेश्वर कारखान्याकडे ऊसतोड मिळावी म्हणून चकरा मारत आहेत. त्यामुळे आमदार मोनिका राजळेंच्या समर्थनार्थ दहिगावने गटात खिंड लढविणारेही चिंतेत आहेत.
मागील वर्षी भावीनिमगाव, शहरटाकळी, ढोरसडे, मठाचीवाडीसह परिसरात बहुतांश शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिले. त्यामुळे उसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली. गळीत हंगामाच्या सुरुवातीपासूनच या भागात ऊसतोड कामगारांची वाढ होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. परिणामी ऊसतोड पाहिजे त्या गतीने होऊ शकली नाही. ज्ञानेश्वर कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या परिसरात वृद्धेश्वर कारखानाही दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊस नेतो. मात्र भावीनिमगाव व परिसरात वृद्धेश्वर कारखान्याची टोळीच नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावले असून लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्यात ऊस पाठविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अशातच ज्ञानेश्वर कारखाना व्यवस्थापनाचाही कर्मचाऱ्यांवरील कंट्रोल सुटत चालल्याची चर्चा आहे. ऊसतोड टोळ्यांकडूनही जादा खुशालीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. याला स्थानिक कर्मचाऱ्यांचीही मूकसंमती असल्याचे चित्र आहे. यामुळे ऐन आर्थिक संकटाच्या काळात ऊस जायला उशीर होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यातच तापमान वाढ झाल्याने कामगारांच्या कार्यक्षमतेत घट झाली आहे.
----
शेतकरी वाऱ्यावर...
वृद्धेश्वर कारखान्याला नियमित ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचा कारखाना व्यवस्थापनाने विश्वासघात केला आहे. उसाची कमतरता असल्यावर ज्यांच्याकडून हक्काने ऊस नेला त्यांना आज कारखान्याने वाऱ्यावर सोडले, अशी खंत रामकृष्ण मुंगसे, राजाराम चव्हाण, राजेश गायधने आदींसह शेतकऱ्यांनी व्यक्त केली.