राशीन : मुबलक पाणी असूनही केवळ सतत खंडित होणा-या वीज पुरवठ्याअभावी शेतातील उभी पिके जळून जाण्याच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने देशमुखवाडी व कुरणाचीवाडीतील संतप्त शेतक-यांनी शुक्रवारी राशीन वीज केंद्र कार्यालयात अभियंत्याला घेराव घातला.गेल्या दोन दिवसांपासून खंडित झालेल्या विजेबाबत जाब विचारून परिसरातील शेतीपंपाचा वीजपुरवठा त्वरित चालू केल्याशिवाय आम्ही येथून उठणार नसल्याची ठोस भूमिका यावेळी संतप्त शेतक-यांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. राजेंद्र देशमुख यांनी प्रश्नावर मध्यस्थी करून अभियंत्याकडेशुक्रवारी रात्रीपासून शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.यावेळी राजेंद्र देशमुख यांच्यासह राशीन ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल मोढळे, विशाल शेटे, बाळू शेटे, सागर मोढळे, विकास भाकरे, महादेव कानगुडे, युवा काँग्रेस अध्यक्ष अविनाश मासाळसह देशमुखवाडी व कुरणाचीवाडीतील शेकडो शेतकरी हजर होते.दरम्यान, विजेअभावी ज्वारी, हरभरा, मका, तूर, कपाशीसारखे पिकांना पाणी असूनही देता येत नाही. जनावरांच्या पिण्याचा पाणी प्रश्न आहे. अगोदरच विविध अडचणीचा शेतक-यांना सामना करावा लागत असताना विजेमुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे. तरी वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतक-यांनी केली.
भारनियमा व्यतिरिक्त राशीन वीज केंद्राला विजपुरवठा पूर्ण दाबाने होतो. विद्युत रोहित्रही पूर्ण क्षमतेचे आहे, पंरतु शेतीपंपाच्या अतिरिक्त दाबामुळे फिडरवरील तारा (जंप) तुटण्याच्या घटना घडतात. त्यामुळे वीज खंडित होते व अपुरे कर्मचारी असल्याने तो सुरळीत करण्यास विलंब होतो. राशीन वीज केंद्रात शेतीपंपाचे सात व राशीन गावठाणाअंतर्गत चार असे एकूण अकरा फिडर कार्यान्वित आहेत. या सात फिडरवरील विद्युत दाब जास्त असल्याने हे फिडर आठ तासाच्या फरकाने तीन टप्यात चालवले जातात.-कुणाल डेकाटे, सहायक प्रभारी अभियंता, राशीन, वीज केंद्र