कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून हवामानात अचानक होत असलेल्या बदलामुळे ढगाळ वातावरण तयार होत आहे. तसेच थंडीचेही प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे .
सध्या तालुक्यातील ग्रामीण भागात काही प्रमाणात लागवड केलेला कांदा व कांदा रोपे, गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला, जनावरांना चारा म्हणून असणारा घास तसेच फळबागा ही पिके शेतकऱ्यांच्या शेतात आहेत. परंतु, ढगाळ वातावरणामुळे वरील पिकांवर लगेचच मावा संवर्गीय किटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यातून पिकांचे खूप नुकसान होऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांना कृषीसेवा केंद्रातून महागड्या रासायनिक कीटकनाशकाची खरेदी करून वरील पिकांवर फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे अतिरिक्त खर्चाचा ताण पडल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.