अहमदनगर : उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आम्ही लाँग मार्च अर्ध्यातून मागे घेतला. गेल्या पंधरा ते वीस दिवसांत मात्र, सातवा वेतन आयोग तसेच सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने नोकरी देणेबाबत मंत्रालय पातळीवरून काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता आम्ही मुंबईत आझाद मैदानावर ३१ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा महापालिका कर्मचारी संघटनेने दिला आहे.
याबाबत बुधवारी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड अनंत लोखंडे, कॉम्रेड अनंत वायकर, उपाध्यक्ष राहुल साबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला. मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, तसेच लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत समावून घ्यावे, या मागणीसाठी मनपा कर्मचाऱ्यांनी २ ऑक्टोबर रोजी नगर ते मंत्रालय असा पायी लाँग मार्च काढला होता.
आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थी नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागण्यांसंदर्भात मंत्रालयात १० ऑक्टोबर रोजी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी भाळवणी पर्यंत गेलेला लाँग मार्च मागे घेण्यात आला होता. त्यानंतर १० ऑक्टोबरची बैठक रद्द झाली, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र, उपमुख्यमंत्री पवार व मुख्यमंत्र्यांचे सचिव यांची भेट घेतली तेव्हा सातवा वेतन आयोगाची फाईल मुख्यमंत्री कार्यालयात असून याबाबत लवकर सकारात्मक निर्णय होईल तसेच वारसा हक्काने नोकरीबाबत मुख्यमंत्री स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. दोन्ही विषयांबाबत गेल्या २० दिवसांत मंत्रालय स्तरावरून काहीच हालचाली न झाल्याने कर्मचारी संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.