कर्जत : दलित समाजासाठी आरक्षित जागेवरील अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर तरडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ केसकर यांनी त्यांचे सहकारी व ग्रामस्थ यांच्यासह सुरू केलेले उपोषण गुरुवारी मागे घेतले.
तरडगाव येथे दलित समाजासाठी शासनाने स्मशानभूमीसाठी ५ आर. क्षेत्र प्रस्तावित केले आहे. तरीही येथे दफनविधी करू दिला जात नाही. गेली ४५ वर्षे झाली तरी संबंधित जमीन मालक या लोकांना या जागेमध्ये येऊ देत नाही. अनेक वेळेस शासन दरबारी हा प्रश्न मांडला असून शासनानेही कोणतीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण केले, असे केसकर यांनी सांगितले. हे उपोषण वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुकाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव चंद्रकांत नेटके, मोहन केसकर, पोपट खरात, रामदास देवमुंडे, संतोष केसकर, भरत देवमुंडे, पिंटू देवमुंडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
तरडगाव येथील स्मशानभूमीत झालेले अतिक्रमण काढले जाईल, असे लेखी आश्वासन तहसीलदार नानासाहेब आगळेे यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.