कोपरगाव : ग्रामपंचायत दप्तरी झालेली मिळकतीची अनाधिकृत नोंद रद्द होण्यासाठी तालुक्यातील मायगाव देवी येथील शेतक-याने पंचायत समिती आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे.मायगाव देवी येथे बाळासाहेब गाडे यांची वडीलोपार्जीत मिळकत आहे. २००६ मध्ये त्यांच्या नातेवाईकांनी सदर मिळकतीची १०० रूपयाच्या मुद्रांकावर १६ हजार रूपयांना रवींद्र गाडे व संदीप गाडे यांना परस्पर बोगस खरेदी दिली. तत्कालिन उपसरपंच प्रभाकर गाडे यांनी मासिक सभेस काही ग्रामपंचायत सदस्य गैरहजर असताना ग्रामसेवकावर दबाव आणून अनाधिकृत नोंद करायला लावली. सदरची नोंद रद्द करण्याच्या मागणीसाठी गाडे यांच्यासह वाळीबा गाडे, प्रवीण भुसारे, शशिकांत कासार, ज्ञानेश्वर गाडे, बापू गाडे, भारत कासार, गोरख गाडे, किरण गाडे व बेबी देशमुख यांनी पंचायत समिती आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे.