अहमदनगर : शहराजवळील वडगाव गुप्ता येथे महालक्ष्मी मातेचे मंदिर उभारणीसाठी ग्रामपंचायत कार्यालय परवानगी देत नसल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्यावतीने उपोषण करण्यात आले. या उपोषणात प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेवराव चांदणे, रावसाहेब चांदणे, प्रदीप शेवाळे, अप्पा कदम, संदीप कासार, अक्षय डोंगरे, तुषार डोंगरे, किरण डोंगरे, संजय शिंदे, संजय चांदणे, दीपक चांदणे, गोरक्षनाथ ढेपे, जालिंदर मोरे, सागर घोडके, शिवाजी डोंगरे आदींसह भाविक उपस्थित होते. वडगाव गुप्ता येथे सुमारे ३०० वर्षापासून महालक्ष्मी माता मंदिर आहे.
हे मंदिर लहान तसेच पौराणिक काळातील आहे. त्यामुळे या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच २०२० मध्ये मंदिराचे भूमिपूजन ग्रामस्थांच्या वतीने व सरपंच यांच्यावतीने करण्यात येऊन तेथे ओटा बांधण्यात आला होता. पुढील बांधकाम चालू असताना हे बांधकाम बंद पाडण्यात आले. गावात सर्व देव देवतांचे मंदिर असून फक्त लक्ष्मी माता मंदिर बांधण्यासाठी काहीजण विरोध करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. येथे भाविकांची गर्दी वाढत असून, आषाढ महिन्यात यात्रा असून बंद पडलेले मंदिराच्या कामाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.