पाथर्डी : तालुक्यातील आरोग्य केंद्रांवर नियमांचे उल्लंघन करून काहींना विना नोंदणी लसीकरण केले जात असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी गुरुवारी येथील लसीकरण केंद्राबाहेर लाक्षणिक उपोषण केले. लसीकरणात गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाईची त्यांनी मागणी केली.
तालुक्यातील लसीकरण केंद्रावर जबाबदार कर्मचारी व अधिकारी हे आपल्या ओळखीच्या लोकांना नियमबाह्य लसीकरणात प्राधान्य देत आहेत. शिल्लक राहिलेल्या लसी परस्पर वितरीत केल्या जातात. शासनाकडून आलेल्या लसी मोजून असताना या केंद्रावर लसी शिल्लक कशा राहतात याची चौकशी व्हावी. नोंदणी नसलेल्या नागरिकांना लसी दिल्यास त्याच्या अधिकृत नोंदी ठेवायला हव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे मुकुंद गर्जे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व महसूल अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांच्याकडे केली होती.
उपोषणापासून परावृत्त होण्यासाठी तहसीलदार शाम वाडकर व पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी उपोषणकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस दिली होती. परंतु, उपोषणकर्ते गर्जे यांनी उपोषण करत लसीकरणातील गैरप्रकार थांबविण्याची मागणी लावून धरली.
यावेळी नगरसेवक बंडू बोरुडे, सीताराम बोरुडे यांनी मध्यस्ती केली. प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वाडकर, नायब तहसीलदार पंकज नेवसे, डॉ. मनीषा खेडकर, आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, पालिका मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी आंदोलकाशी चर्चा केली. यापुढील कालावधीत कुठलाही गैरप्रकार होऊ देणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर मुकुंद गर्जे यांनी आपले उपोषण स्थगित केले.
--
१३पाथर्डी उपोेषण
पाथर्डी येथे सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी लसीकरण केंद्राबाहेर उपोषण केले.