जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील कुकडी डाव्या कालव्यापासून सिद्धेश्वर ओढ्यातून राजरोस दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात चोरून वाळूउपसा होत आहे. याबाबत महसूल विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी ग्रामस्थांनी ओढ्याजवळ उपोषण सुरू केले आहे. काही काळ ओढ्यातील पाण्यात उभे राहूनच उपोषण करण्यात आले.परिवर्तन चळवळीच्या माध्यमातून रामदास घावटे यांच्या नेतृत्वाखाली ही उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी ओढ्याजवळच मंडप टाकण्यात आला आहे. जवळे गावातील वाळूचोरीचे पंचनामे करून पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करावेत, गावातील वाळू चोरी पूर्णपणे थांबवावी, वाळूचोरीमुळे सरकारचा बुडालेला महसूल संबंधितांकडून वसूल करावा, या मागण्यांसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत कारवाई करण्यात येत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. उपोषण काळात गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून घावटे यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी शरद पवळे यांनी केली आहे. या उपोषणास निघोज येथील दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते बबन कवाद, शरद पवळे, भानुदास साळवे, भ्रष्टाचार जनआंदोलनाचे कार्यकर्ते संजय वाघमारे, सचिन नगरे, तुषार औटी, रंजना पठारे, ज्ञानदेव पठारे, महेंद्र पठारे, प्रभाकर घावटे, गंगाधर सालके, बाबाजी गाडीलकर, नामदेव रसाळ, भाऊसाहेब आढाव, मंगेश सालके, संतोष सालके, रमेश सालके यांनी पाठिंबा दिला आहे.
जवळे येथील सिद्धेश्वर ओढ्याच्या पाण्यात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 6:52 PM