नेवासा (जि. अहमदनगर) : अहमदनगर - छञपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा तालुक्यातील वडाळा (बहिरोबा) जवळ कार व आयशर टेम्पोची धडक होवून झालेल्या भीषण अपघात चार जण ठार झाले तर एक महिला जखमी आहे. रविवार (दि.११) रोजी सकाळी साडे नऊ - दहा वाजेच्या सुमारास अहमदनगर कडून छञपती संभाजीनगरच्या दिशेने जात असलेल्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर कार क्रमांक (एम एच १४.एस सी.९००७)धडकून समोरून येणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक (एम एच ४८ टी ५३१९) ला जोरदार धडक बसल्याने सदर अपघात झाला.
अपघात एवढा भीषण होता की जागेवर तिघांचा मृत्यू झाला तर एकाचा उपचरापूर्वी मृत्यू झाला असून मृतांमध्ये सर्व पुरुष असून एक महिला जखमी असून त्यांच्यावर नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. इंदौर येथील भाविक देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला असल्याची माहिती शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रामचंद्र कर्पे यांनी दिली. अपघाताची माहिती समजताच शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रामचंद्र कर्पे , पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर माळवे,गुलाब मोकाटे,रमेश लबडे यांनी घटनास्थळी भेट देवून अपघातातील मृतांची मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात शववच्छेदनासाठी पाठवून महामार्गावरील वाहतूक सुरुळीत केली. या अपघातात राहुल परमेश्वर शर्मा (वय २७ वर्ष रा. कलंदी गोल्ड सिटी इंदोर), हर्ष मनोहर शर्मा (वय १८ रा.रतलाम, मध्यप्रदेश) ,योगेश परमेश्वर शर्मा (वय २४ वर्ष रा.कुंडली जिल्हा धार,मध्य प्रदेश), अविनाश मंडलेचा ( वय २५ वर्ष रा.महालक्ष्मी हिवरे,ता.नेवासा जि.अहमदनगर) हे मयत झाले आहेत.
राणू परमेश्वर शर्मा (वय २६ वर्ष रा.गोल्ड सिटी इंदोर),या जखमी असून त्यांच्यावर नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रामचंद्र कर्पे यांनी सांगितले.