शेवगाव : तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींसाठी ८३.६१ टक्के शांततेत मतदान झाले. १५२ मतदान केंद्रांत झालेल्या मतदानातून ३७७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. तालुक्यातील ४८ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी ८३.६१ टक्के मतदान झाले. मतदानवेळी कुठलीही अनुचित प्रकार प्रकार घडला नाही. शांततेत झालेल्या मतदान प्रक्रियेत यंत्र बिघाडीच्याही तक्रारी आल्या नाहीत. घोटण येथे सायंकाळी सातपर्यंत मतदान सुरू होते.
सकाळी साडेनऊपर्यंत मतदानाचा वेग कमी असल्याने १४ टक्के मतदान झाले. त्यानंतर साडेअकराला ३६ टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारच्या सुमारास मतदानाला जोरदार सुरुवात झाल्याने दुपारी दीड वाजेपर्यंत ५८ टक्के मतदान होऊन साडेतीन वाजेपर्यंत ही टक्केवारी ७४.१८ टक्क्यांवर गेली. सायंकाळी साडेपाचनंतरही काही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या.
काही ठिकाणी साडेसहा तर घोटणला सात वाजेपर्यंत मतदान चालू होते. मतदानात ३५ हजार ९९२ पैकी २९ हजार ६४४ महिला, तर ३९ हजार १८० पैकी ३३ हजार १४६ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ७५ हजार १०२ मतदारांपैकी ६२ हजार ७९० मतदारांनी मतदान केले.