अहमदनगर : पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी दरोडा टाकून त्यांच्या पित्याचा खून करणारा श्रीगोंदा येथील कुख्यात दरोडेखोर फद्या गोचंद काळे (वय ५०) याला नऊ वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. एलसीबी पथकातील पोलीस नाईक विजय वेठेकर यांच्या घरी फद्या व त्याच्या साथीदारांनी नऊ वर्षापूर्वी दरोडा टाकला होता. या घटनेत त्यांचे वडिल बाळासाहेब रामा वेठेकर यांचा मृत्यू झाला होता.सध्या स्थानिक गुन्हे शाखेत असलेले पोलीस नाईक विजय वेठेकर हे २०१० मध्ये नगर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ६ एप्रिल २०१० रोजी विजय यांच्या कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथील घरी फद्या काळे, कैलास वेठेकर, कोके उर्फ सचिन चव्हाण यांच्यासह त्यांच्या चार साथीदारांनी रात्रीच्यावेळेस दरोडा टाकला. यावेळी विजय यांच्या आई सुमनबाई व वडिल बाळासाहेब हे जागे झाले. सुमनबाई यांनी फद्या व त्याच्या साथीदारांना ओळखले. आपली ओळख उघड होऊ नये म्हणून फद्या व त्याच्या साथीदारांनी सुमनबाई व बाळासाहेब यांना जबर मारहाण करत त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच घरातून ३७ हजार रूपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच विजय यांनी घरी धाव घेत आई-वडिलांना नगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बाळासाहेब यांच्या डोक्याला मात्र जबर मार लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर सुमनबाई या घटनेतून वाचल्या.याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फद्या याच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात फिर्याद दाखल झाली होती. घटनेनंतर फरार झालेला कैलास वेठेकर व सचिन चव्हाण या दोघांना पोलीसांनी अटक केली. मुख्य आरोपी फद्या मात्र फरार होता. फद्या याला अटक करण्यासाठी विजय गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. अखेर फद्या हा जांभळा (ता. गंगापूर) येथे शिवा पांडु काळे हे नाव सांगून वावरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाली. विजय वेठेकर यांच्यासह सहाय्यक निरिक्षक कैलाश देशमाने, श्रीधर गुट्टे, कॉस्टेबल दत्ता हिंगडे, सोन्याबापू दिनकर, सुनील चव्हाण, संदिप पवार, भागिनाथ पंचमुखी, रविंद्र कर्डिले, विशाल दळवी, रोहिदास नवगिरे, मनोहर गोसावी, संदिप पवार, विशाल दळवी, विजय ठोंबरे यांच्या पथकाने जांभळा परिसरात फद्या याच शोध घेतला तेंव्हा तो मिळून आला. पथकाला पाहताच तो डोंगरात पळाला. यावेळी पथकाने पाठलाग करून त्याला अटक केली.नाव बदलून राहत होता फद्यादरोडा टाकून फरार झालेला फद्या हा जांभळा (ता. गंगापूर जि.औरंगाबाद) येथे शिवा पांडु काळे हे नाऊ घेऊन राहत होता. त्याने त्याच्या पत्नीचेही नाव बदले होते. त्याच्या मुलांच्या शाळेच्या दाखल्यावरही शिवा काळे असेच नाव होते. त्यामुळे नऊ वर्षे त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने फद्याचा शोध घेऊन त्याला अटक केली.