सोमनाथ गोरख करपे (वय १८ वर्षे) असे मृत मुलाचे नाव आहे.
गोरख करपे हा दारू पित असल्याने, घरात कायम किरकोळ वाद होत होते. सोमवारी (दि.२९) गोरख दारू पिऊन घरी आला. पत्नी ताराबाई सायंकाळी शेतातून घरी परतली. आज होळीचा सण असून, तुम्ही सणासुदीचे दारू का पिऊन आले, असे विचारले. त्यावेळी गोरख पत्नीला मारण्याकरिता पुढे आला असता, मुलगा सोमनाथमध्ये आल्याने तिचा मार वाचला. त्यावेळी गोरख मुलाला शिवीगाळ करत घरातून निघून गेला.
त्यानंतर, ताराबाई व मुलगा सोमनाथ हे दोघे जेवण करून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेले. ताराबाईची जाऊ मुक्ता भाऊसाहेब करपे या त्यांच्या पिकाला पाणी देण्यास आल्या होत्या. सोमनाथ हा उसाला पाणी देत होता, तर त्याची आई ताराबाई उसाच्या शेवटच्या टोकाला पाणी पोहोचल्यावर आवाज देऊन सांगत होती. दोघांमध्ये साधारण शंभर फुटाचे अंतर होते. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोमनाथचा ओरडल्याचा आवाज आल्याने, ताराबाई पळत त्याच्याकडे गेली, त्यावेळी गोरख डोक्यावर लोखंडी गजाने मारत होेता. या हल्ल्यात सोमनाथ गंभीर जखमी होऊन त्याच्या डोक्यातून रक्त येत होते.
घटना समजताच, शेजारीच पिकाला पाणी देत असलेले मुक्ता करपे, अंबादास जाधव, सतीश पायघन हे घटनास्थळी धावले. त्यांनी जखमी सोमनाथ यास नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, औषधोपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. मयत मुलाची आई ताराबाई हिने पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरार झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुजीत ठाकरे करीत आहे.