पोलीस हेडकॉन्स्टेबल बन्सी येशू टोपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दशरथ माळी यांचा खून १५ मे रात्री दहा ते १६ मे सकाळी सातच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील चिखली येथे झाला होता. दशरथ माळी हे त्यांच्या दोन्ही मुलांसमवेत संगमनेर तालुक्यातील चिखली येथे एका वीटभट्टीवर काम करत होते. चिखली येथे त्यांचा मृतदेह आढळून आल्याने याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. माळी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक निकिता महाले करत होत्या. बुधवारी शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला असता त्यात दशरथ माळी यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. खुनाच्या या घटनेत तपासी अधिकारी महाले यांना संशय वाटल्याने त्यांनी मयत माळी यांच्या दोन्ही मुलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रामदास व अमोल माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळी यांच्या डोक्यात मारून जखमी करत त्यानंतर गळा आवळून त्यांच्या खून करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक महाले अधिक तपास करीत आहेत.
बापाचा खून ; दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:22 AM