अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने कठोर निर्बंध लागू केले. परंतु, तरीही नागरिक विनाकारण रस्त्यावर गर्दी करत होते. काही केल्या गर्दी कमी होत नव्हती. अखेर रस्त्यावर उतरून दिसेल त्याची चाचणी करण्याची मोहीम सुरू झाली. चाचणीच्या भीतीने विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. गर्दीवर चाचणीची मात्रा प्रभावी ठरल्याचे चित्र सध्या शहरात पहायला मिळत आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेकडून कडक उपाययोजना हाती घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्या संकल्पनेतून पोलिसांच्या मदतीने शहरातील चौकाचौकात कोविड चाचणी केंद्र उभारले गेले. गेल्या आठ दिवसांपासून दररोज कुठेना कुठे ही मोहीम सुुरू आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी करून त्यांची ॲंटिजन चाचणी केली जाते. चाचणी पॅाझिटिव्ह आल्यास थेट कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी केली जाते. शहरातील महत्त्वाच्या दिल्लीगेट, पत्रकार चौक, जिल्हा पोलीस अधीक्षक चौकात चाचणी केंद्र उभारण्यात आले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत पोलीसही उपस्थित असतात. चाचणीच्या भीतीने विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही कमी होऊ लागली आहे. औषधे व दवाखान्यांचे नाव सांगून अनेकजण फिरत होते. हे प्रमाणही आता कमी झाले आहे. त्यात रुग्णांची संख्याही कमी होऊ लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
....
- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना शहरात राबविण्यात येत आहेत. रस्त्यावरील चाचणीमुळे बराच फरक पडला आहे. विनाकारण फिरणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले असून, रुग्णसंख्याही कमी झालेली आहे. भाजीविक्रेते, दुकानदारांचा कठोर निर्बंध लागू करण्यास विरोध आहे. परंतु, नाइलाज आहे. कोरोनाची साखळी तुटणे गरजेचे आहे. त्यामुळे कठोर निर्णय घेण्यात येत असून, या निर्णयांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. थोडीसी जरी ढिल दिली तरी संसर्ग वाढू शकतो. खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना करण्यात येत असून, नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे.
- शंकर गोरे, आयुक्त, महापालिका
....
फोटो