अहमदनगर : महापालिका निवडणुकीपूर्वीच तपोवन रस्त्याचे वाजत गाजत उदघाटन पार पडले़ निवडणूक होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेला़ मात्र अद्याप कामाला सुरुवात झाली नसून, या कामासाठी प्रशासनाने आता फेब्रुवारीचा मुहूर्त काढला आहे़मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत औरंगाबाद व मनमाड महामार्गाला जोडणाऱ्या तपोवन रस्त्याचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे़ रस्त्याच्या कामासाठी निधी कोणता वापरायचा, यावरून सेना- राष्ट्रवादीत वाद उफाळून आला होता़ अखेर आ़ संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश आले़ सरकारकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला़ या रस्त्यात लक्ष्मीनगर सोसायटी परिसरात अतिक्रमण होते़ लक्ष्मीनगर सोसायटीने या रस्त्यासाठी जागा देण्याची तयारी दर्शविली़ त्यामुळे या रस्त्याच्या कामातील प्रमुख अडथळा दूर झाला़ महापालिका निवडणुकीपूर्वी या कामाचे आ़ संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले़ परंतु, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही़ मुख्यमंत्री ग्राम सडक कार्यालयाकडून या कामासाठी चालू महिन्यात कार्यारंभ आदेश दिला़संबंधित ठेकेदारानेही काम सुरू करण्याची तयारी सुरू केली असून, पुढील आठ दिवसात तपोवन रस्त्याचे काम सुरू होणार आहे़ औरंगाबाद महामार्गापासून या कामाला सुरुवात होणार असून, खडीकरण आणि त्यानंतर डांबरीकरण करण्यात येणार आहे़ औरंगाबाद- मनमाड महामार्गाला जोडणाºया तपोवन रस्त्याचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडलेले आहे़शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक दिगंबर ढवण यांनी तपोवन रस्त्याचे काम महापालिका निधीतून करण्याची मागणी महापौरांकडे केली होती़ तसा ठरावही महासभेत घेण्यात आला़ परंतु, या रस्त्याचे काम शासनाच्या योजनेतून करण्यासाठी आ़ संग्राम जगताप आग्रही होते़ त्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला़सावेडीतील कचरा डेपोकडे जाणारी वाहने या रस्त्याने जातात़ त्यामुळे या रस्त्याचे काम १४ व्या वित्त आयोगातून करण्याची सेनेची मागणी होती़ परंतु, शासनाने या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला़ त्यामुळे तपोवन रस्त्याच्या मजबुतीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून, हे काम येत्या फेब्रुवारीमध्ये सुरू होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले़
तपोवन रस्त्याच्या कामाला फेब्रुवारीचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 1:29 PM