अहमदनगर : भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेतर्फे ‘एफआयएपी’ (फेलोशीप ऑफ इंडियन ॲकडमी ऑफ पेडियाट्रीक्स) ही सर्वोच्च सन्माननीय पदवी येथील डॉ. सुचित तांबोळी यांना प्रदान करण्यात आली. ही पदवी मिळविणारे ते नगर जिल्ह्यातील पहिले बालरोगतज्ज्ञ आहेत. डॉ. तांबोळी यांच्या २९ वर्षांच्या संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.
ही सन्माननीय पदवी भारतातील बालरोगतज्ज्ञ संघटनेमध्ये सर्वोच्च मानली जाते. भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे देशभर तीस हजारांहून अधिक सदस्य आहेत. यावर्षी महाराष्ट्रातून फक्त तीन बालरोगतज्ज्ञांना ही पदवी मिळाली आहे. या पदवीसाठी संशोधन, समाजासाठी केलेले कार्य, बालरोगतज्ज्ञांना जागृत करण्यासाठी केलेले प्रयत्न या सर्वांचा विचार केला जातो. ही पदवी विद्यापीठातील डी.लिट. पदवीच्या समकक्ष मानली जाते. ही सन्माननीय पदवी भारतातून दरवर्षी फक्त १० – १५ बालरोगतज्ज्ञांना त्यांच्या कार्याबद्दल प्रदान केली जाते. डॉ. तांबोळी यांनी जानेवारी १९९२ सालापासून अहमदनगर येथे महाराष्ट्रातील पहिले बालविकास केंद्र सुरू केले. ते बालरोग व बालविकासतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संशोधनपर भाषणे दिली आहेत. तसेच जनजागृतीसाठी आठशेंच्यावर भाषणे दिली आहेत. बालविकास, वयात येतानाची मुले, वर्तन समस्या, मुलांच्या वाढीचे प्रश्न, बौद्धिक विकास कार्यक्रम, समुपदेशन विषयांमध्ये तांबोळी यांनी मूलभूत संशोधन करून संपूर्ण भारतातील बालरोगतज्ज्ञांना प्रशिक्षण दिले आहे.
--
फोटो- ०५ सुचित तांबोळी