कोपरगाव : कोविड सेंटरमधील ऑक्सिजन संपला असून, पेशंट मरत आहेत, तुम्ही काय करतात, असे म्हणत दारू प्यायलेल्या दोन डॉक्टरांनी कोविड सेंटरच्या ऑक्सिजन विभागाच्या प्रमुख महिला डॉक्टरसह त्यांचे पतीस शिवीगाळ करीत अंगावर धाऊन येत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना कोपरगाव शहरातील एसएसजीएम कोविड केअर सेटरमध्ये शनिवारी (दि.८) पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी डॉ.भाग्यश्री कुणाल घायतडकर ( वय २८, रा.शारदानगर, कोपरगाव ) यांच्या फिर्यादीवरून वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र भानुदास पारखे (रा. साईनगर, ता.राहाता ), समुदाय आरोग्य अधिकारी अक्षय देवीचंद गायकवाड ( रा. कर्मवीरनगर, कोपरगाव) यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पहाटे ५. ४४ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला डॉ.भाग्यश्री घायतडकर घरी असताना शनिवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास वैद्यकिय अधिकारी डॉ.राजेंद्र पारखे यांनी त्यांना मोबाइलवर फोन करून एसएसजीएम कोविड सेंटरचा ऑक्सिजन संपला आहे व तेथील पेशंट मरत आहेत, असे सांगितले. त्यावर महिला डॉक्टर यांनी त्यांचे पती डॉ.कुणाल घायतडकर यांना घेऊन ३ वाजण्याच्या सुमारास कोविड सेंटर गाठले. हे दोघे तेथे पोहोचल्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पारखे व समुदाय आरोग्य अधिकारी अक्षय गायकवाड यांनी महिला डॉक्टर व त्यांच्या पतीस मोठमोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, तसेच अंगावर धावून येत मारहाण करण्याचा प्रयत्न केला, तसेच त्याच्या तोंडातून दारू प्यायल्याचा वास येत होता, असे फिर्यादीत म्हंटले आहे.
दरम्यान, कर्तव्यावर असताना दारू पिऊन येत शिवीगाळ करण्याची याच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. बुधवारी (दि.५) कोपरगाव तालुक्यातील वारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवकाने कर्तव्यावर असताना दारू पिऊन येत एका रुग्णांना शिवीगाळ केली होती.