घारगाव : संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथे गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अनिल संभाजी मधे हा तरुण जखमी झाला होता. यावेळी वन खात्याने तात्काळ पिंजरा लावला होता. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याची मादी अखेर जेरबंद झाली.
आंबी दुमाला येथील शिंदे वस्ती येथे सावकार शिंदे यांची शेती अनिल मधे वाट्याने करतात . या शेतात मधे हे कांद्याच्या रोपाला पाणी भरत होते . यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून त्यांना खाली पाडले होते. यात मधे जखमी झाल्याने त्यांना औषध उपचारासाठी बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते . यावेळी ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केली होती.वनविभागाने तात्काळ पिंजरा लावला होता.
शुक्रवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात बिबट मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली. पिंजऱ्यातून बाहेर येण्यासाठी धडपड केल्याने ती जखमी झाली. पिंजऱ्याचे गज वाकविल्याने बिबट्याची मादी बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक दिलीप उचाळे, बाळासाहेब वैराळ, सुभाष धानापूने आदींनी दुसरा पिंजरा लावला. त्यात बिबट मादी जेरबंद झाली. या बिबट्याच्या मादीची रवानगी चंदनापुरी येथील निसर्ग परिचय केंद्रात करण्यात आली.