शेवगाव : खरीप हंगामासाठीची खते, बियाणे खरेदी सध्या सुरू आहे. या दोन्हींचीही चढ्या भावाने विक्री हाेऊ नये यासाठी शेवगाव तालुका कृषी विभागाने विशेष नियोजन केले आहे. या प्रक्रियेवर भरारी पथकाचा वॉच राहणार आहे. जादा दराने खते, बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल कदम यांनी दिली.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी लागणारी रासायनिक खते शासनाच्या दराने खरेदी करावीत. तसेच खात्री करून संबंधित दुकानातून पक्की बिले घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रासायनिक खतांच्या दराबाबत संभ्रम निर्माण आहे. मान्सून काही दिवसांवर येऊन ठेपला असताना खत खरेदीसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रांसमोर गर्दी करीत आहेत. ही खते खरेदी करताना शेतकऱ्यांनी दराबाबत सावधानता बाळगणे आवश्यक आहे. खते खरेदीबाबत शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच ती खरेदी करण्याचे आवाहन पंचायत समिती कृषी अधिकारी राहुल कदम यांनी केले आहे.
युरिया २६६ रुपये ५० पैसे, डीएपी १ हजार २०० रुपये, एमओपी १ हजार रुपये, २४.२४.०० १ हजार ४५० रुपये, २४.२४.००.०८. १ हजार ५०० रुपये, २०.२०.००.१३. ९७५ ते १ हजार १५० रुपये, १२.३२.१६. १ हजार १८५ ते १ हजार ३७० रुपये, १४.३५.१४. १ हजार ३६५ ते १ हजार ४०० रुपये, १४.२८.००. १ हजार २८० रुपये, १६.१६.१६. १ हजार १२५ रुपये, २८.२८.००. १ हजार ४५० ते १ हजार ४७५ रुपये, १५.१५.१५.०९. १ हजार १५० रुपयेअसे शासकीय दर आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खत विक्रेत्यांनी नियमानुसार पॉस मशिनवरच खत विक्री करावी व कुठलीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी तपशीलवार खरेदीची पक्की पावती घ्यावी. तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर थोडे बियाणे, बॅग, खरेदी पावती, कापणी होईपर्यंत जपून ठेवावी. कीीटकनाशक औषध फवारणी करताना काळजी घ्यावी. शेतकऱ्यांची काही तक्रारी असल्यास त्यांनी तालुका कृषी विभाग अथवा पंचायत समिती कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कदम यांनी केले आहे.
----
..तर तत्काळ कारवाई
खते, बियाणांची चढ्या दराने विक्री होऊ नये यासाठी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. निविष्ठांबाबत काही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचा इशारा, कृषी अधिकारी किरण मोरे व राहुल कदम यांनी दिला आहे.