शिर्डी मतदारसंघात मतदारांनी राजकीय सरंजामशाहीला चाप लावण्याचे काम केले आहे. आम्ही सांगू तो उमेदवार, आम्ही सांगू त्याला निवडून आणू या अविर्भावात वावरणार्यांना सेनेच्या सदाशिव लोखंडे यांच्या विजयाने जोरदार चपराक दिली आहे. राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन भाऊसाहेब वाकचौरेंना शिवसेनेतून फोडले. सोबतच काँग्रेसची उमेदवारीही बहाल केली. यानंतर वाकचौरे समर्थक विजयाबाबत निश्चिंत झाले होते. या घटनेचे सेनेला दिलेला धक्का, असेच वर्णन केले जात होते. मात्र पुढील काही दिवसात वाकचौरेंना आणि पर्यायाने आघाडीलाच धक्के खाण्याची वेळ आली. शिवसैैनिकांचा रोष एवढा तीव्र होता की त्यामुळे भावनेचे राजकारण ढवळून निघाले. वाकचौरे हे विखेंचे उमेदवार असल्याचा प्रचारही जोरकसपणे झाला. त्यामुळे विखे विरोधात असलेले आघाडीतील नेते नावालाच सोबत राहीले. काहींनी तर जाहीर विरोध केला. त्यामुळे वाकचौरेंची वाटचाल अधिकच खडतर होत गेली. त्याविरोधात ऐनवेळी मैदानात उतरलेले लोखंडेही प्रारंभी चाचपडतच होते. पण मतदारांची सहानुभूती त्यांच्या पाठीशी उभी राहीली. त्यामुळे या मतदारसंघात कोणतेही राजकीय कार्य नसताना लोखंडेना समर्थन मिळत राहीले. अखेरीस मोदी लाटही कामात आली. बदलांच्या या वार्यात लोखंडेंनी आघाडीच्या बालेकिल्यात जागा सेनेकडे राखण्याची कामगिरी करुन दाखविली. तीन मंत्री असलेल्या या मतदारसंघात महायुतीने सर्व सहा विधानसभा मतदारसंघात मतांची आघाडी मिळवून ‘आघाडी’ला आत्मचिंतन करण्यास भाग पाडले आहे. की फॅक्टर काय ठरला? ‘प्रस्थापितांना विरोध’ हाच मुद्दा महायुतीच्या यशाचे मुख्य कारण ठरले. प्रचारात आघाडीला या मुद्याला उत्तर देणे तर सोडा, तो खोडूनही काढता आला नाही. त्यामुळे महायुतीने यावर अधिक भर देत प्रचाराचे रान पेटविले. याचा परिणाम एवढा झाला की भाऊसाहेब वाकचौरेंना प्रचार करणे अवघड झाले. एकट्याने प्रचार करणारे वाकचौरे त्यामुळे मतदारसंघात दिसलेच नाहीत. ते सतत नेत्यांच्या गराड्यात वावरले. वाकचौरेंनी सेनेला धोका दिला, हा मुद्दा सामान्य मतदाराच्या गळी उतरविण्यात महायुतीने कमालीचे यश मिळविले. येथेच वाकचौरेंच्या पराभवाचा पाया रचला गेला. उर्वरित काम मतदारसंघात असलेल्या आघाडीतील ‘राजकीय साठमारी’ने तडीस नेले.
‘सरंजामशाही’ खालसा
By admin | Published: May 17, 2014 12:47 AM