श्रीगोंदा : घरी अठरा विश्वे दारिद्र्य आणि ती एका पायाने अपंग. लहानपणापासून शिक्षणाची दुर्दम्य इच्छा आणि शिकण्याची उर्मी घेऊन ती मोठी होत गेली. रोज सहा किलोमीटरचे अंतर एका पायाने तुडवून तिने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर काष्टीतील परिक्रमा कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन इंजिनिअर होण्यासाठी धडपडणारी ही आदिवासी मुलगी आहे, सायका शिंगा वळवी.नंदुरबार जिल्ह्यातील वेली (ता. अक्कलकुवा) हे सायकाचे मूळ गाव. आदिवासी शेतकरी शिंगा व शांतीबाई यांना दोन मुलं आणि मुली असा हा सात जणांचा परिवार. त्यातली सायका ही थोरली. सायका लहान असतानाच तिला पोलिओने ग्रासले. त्यात तिचा एक पाय कायमचाच निकामी झाला. आपण शिकलो नाही पण आपल्या लेकरांनी शिकावे, अशी आई-वडिलांची इच्छा होती़ म्हणूनच त्यांनी सायकालाही शाळेत पाठविले. एका पायावर रोज शाळेचा सहा किलोमीटरचा रस्ता तुडवून सायकाने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पहिल्यापासून अत्यंत हुशार व अभ्यासू असलेल्या सायकाने बारावीही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करीत इंजिनिअर होण्यासाठी काष्टीच्या परिक्रमा शैक्षणिक संकुलात प्रवेश घेतला.सायका ही वसतिगृहापासून कॉलेजपर्यंत एका पायावर जात होती. तिची रोजची धडपड पॉलिटेक्निकमधील सिव्हील विभागातील प्राध्यापक व कर्मचा-यांना पाहावली नाही़ सर्वांनी सायकाचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी दिवाळीला सायकाला सुमारे आठ हजार रुपये किमतीची सायकल भेट दिली़ त्यामुळे आता सायकाचा एका पायावरचा प्रवास आता तीन चाकी सायकलवर येऊन पोहोचला आहे.
परिक्रमाचा मदतीचा हात
सायकाचा बारावीनंतरचा शैक्षणिक प्रवास आणखी खडतर झाला़ आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. त्यामुळे शिक्षणासाठी पैसे नव्हते़ तरीही सायकाने डेअरींग केली आणि आॅनलाईन पद्धतीने परिक्रमा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला. प्रवेशासाठी पैसे जमविले आणि घेतले अॅडमिशऩ आता प्राचार्य मोहन धगाटे व सिव्हील विभागाचे प्रमुख शिंदे यांनी सायकाच्या जिद्दीला सलाम करीत सायकाला मदतीचा हात दिला आहे.
फुकटचे नको सर..
स्वाभिमानाने जगायचे, कोणापुढे हात पसरायचे नाहीत, अशी आई-वडिलांची शिकवण़ त्यामुळे स्वाभिमानाची शिकवण घरातूनच मिळालेली आणि गरीब घरातून आलेली सायकाही कोणाची मदत घेत नव्हती. आई-वडील सांगतात कोणाचे फुकटचे घ्यायचे नाही़ मलाही नको सर सायकल, असे सांगत तिने चक्क ही सायकलच नाकारली़ पण प्राध्यापक, प्राचार्यांनी तिची समजूत काढली आणि सायका पहिल्यांदा तीन चाकी सायकलवर बसली.
मी आदिवासी शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे़ इंजिनिअर होण्यासाठी परिक्रमात आले आहे. फुकट कुणाचं काही घेऊ नका, अशी मायबापाची शिकवण आहे़ त्यामुळे मी सायकल घेणार नव्हते़ पण सरांनी खूपच विनंती केली़ शब्दाला मान देण्याच्या भावनेतून मी सायकलची भेट स्वीकारली आहे.-सायका वळवी, विद्यार्थिनी