बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : दिवसभर उन्हातान्हात दगडांशी जीवघेणी झुंज द्यायची. रात्री पुन्हा पिण्याच्या पाण्याची भ्रांत. पिण्याच्या पाण्याचा टॅँकर येतो १५ दिवसांनी. ते पाणीही गाळ मिश्रित. इतरवेळी टिपाडभर पाण्यासाठी मोजावे लागतात ६० रूपये. अशा विविध प्रश्नांचा सामना करणाऱ्या मांडवगण येथील वडारवाडी, गोसावीवाडी (ता. श्रीगोंदा) येथील ग्रामस्थांकडे प्रशासन, राजकीय पदाधिकारी कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे वडारवाडीतील कष्टकरी कुटुंब मेटाकुटीस आली आहेत.श्रीगोंदा-मांडवगण रस्त्यावरील माळरानावरील वडार, गोसावीवाडीची लोकसंख्या जवळपास ५०० आहे. येथील सर्व पुरुष, महिला दगड, धोंडे फोडून उदारनिर्वाह करतात. त्यातील अनेकांना गुंठाभरही जमीन नाही. ज्यांना जमीन आहे, त्यांच्या जमिनीत काही पिकत नाही. वडारवाडीतील पुरुषांबरोबरच महिलांनाही दररोज किमान शंभर ते सव्वाशे किलोमीटर अंतरावर जाऊन दगड फोडावे लागतात. विशेषत: रस्त्यावरील कामावर हे लोक मोठ्या संख्येने असतात. श्रमाचा मोबदला म्हणून प्रतिदिन २५० ते ३०० रूपये रोजंदारी मिळते. दिवसभर दगड फोडून आल्यानंतर रात्री पुन्हा पाण्याची भ्रांत असते. पंधरा दिवसातून एकदा शासकीय टॅँकर येतो. त्यातून जे मिळेल ते पाणी साठवायचे. तेही अनेकदा गाळमिश्रित असते. याशिवाय इतर खासगी टॅँकर येतात. ते ६० रूपयांमध्ये टिपाडभर पाणी देतात. असेच पाणी विकत घ्यावे लागते, असे येथील ग्रामस्थ सांगतात.मांडवगण ग्रामपंचायतीने वडार व गोसावीवाडी नळपाणी योजना केली. नवीन योजनेचे उद्घाटन दिमाखात झाले. मात्र पाईपमधून थेंबभरही पाणी आले नाही. जुन्या योजनेच्या विहिरीचा ताबा काही बड्या मंडळींनी घेतला आहे. त्यांच्या विरोधात बोलणार कोण? अशी अवस्थाआहे.येथे एक हातपंप आहे. त्याचीही पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे अनेकदा पाणी मिळतच नाही. शासनाच्या टॅँकरचे पाणी येते. ते पाणी जनावरेही पित नाहीत. आम्हाला बºयाचदा तेच पाणी प्यावे लागते. त्यामुळे अनेक जण आजारी पडतात. -उज्ज्वला विठ्ठल जाधव, वडारवाडी,
दिवसभर दगडांशी झुंज; रात्री पाण्याची भ्रांत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:37 PM