राहुरी : तालुक्यातील येवले आखाडा येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २६ मार्च रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी दाखल झालेल्या फिर्यादीवरुन दोन्ही गटातील सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
आनंदा परबत लांडगे (वय ७६, रा.येवले आखाडा, ता.राहुरी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. २६ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेदरम्यान आनंदा लांडगे हे त्यांचे राहते घरी असताना गोकुळ आगलावे (रा.सावळी विहीर, ता. कोपरगाव), रवींद्र शेटे, बेबी शेटे (दोन्ही रा.येवले आखाडा) हे घरासमोर आले व तुमचा मुलगा गोवर्धन कोठे आहे, असे म्हणाले. यावेळी गोवर्धन हा जनावरांसाठी चारा आणायला शेतात गेला आहे. यावेळी त्यांनी त्याला तातडीने बोलावून घ्या, असे सांगितले. त्याला बोलावून घेतले. यावेळी सर्वांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी मलाही मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसरी फिर्याद ही बेबी रामदास शेटे (वय ४०, रा.येवले आखाडा) यांनी दिली आहे. २६ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेदरम्यान या घटनेतील फिर्यादी व त्यांचा मुलगा रवींद्र रामदास शेटे व जावई गोकुळ शांताराम आगलावे यांनी आरोपींच्या घरासमोर जाऊन म्हणाले, तू मला रात्री बेरात्री फोन का करतो. यानंतर मला फोन करत जाऊ नको, असे म्हणाल्याचा राग आल्याने आगलावे यास लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी मलाही आरोपींनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गोवर्धन लांडगे, आनंदा लांडगे, साखरबाई लांडगे, आनंदा लांडगे यांची सून नाव माहित नाही (सर्व रा.येवले आखाडा) यांच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.