पाथर्डी : मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मुख्य जलवाहिनीवरून बेकायदा नळजोड घेतलेल्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा, असे आदेश नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले. तसेच मोघम उत्तरे व माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी चांगलेच फैलावर घेत हलगर्जीपणा केल्यास कडक कारवाईचा इशारा यांनी दिला.
मिरी प्रादेशिक योजने अंतर्गत ३३ गावे येत असून मुळा धरणातून यासाठी पाणीपुरवठा होतो. प्रादेशिक नळ योजनेच्या लाभाविषयी गेल्या दहा वर्षांपासून गावोगावच्या लोकांच्या तक्रारी वाढत असून बेकायदा नळजोड, पाईपलाईन फोडून पाणी घेणे, मीटरची नासधूस, थकीत वीज बिल आदी मुद्यांवरून योजना चर्चेत आहे. योजनेवरील गावांमध्ये टंचाई काळातमध्ये टँकर पुरवावे लागले. या तक्रारींनंतर लाभ क्षेत्रातील गावांचे ग्रामसेवक, सरपंच व अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक पाथर्डी पंचायत समिती सभागृहात झाली.
यावेळी गटविकास अधिकारी शीतल खिंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, काशिनाथ लवांडे, शिवशंकर राजळे, माजी सभापती संभाजी पालवे, पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष एकनाथ आटकर, पुरुषोत्तम आठरे, गोकूळ दौंड, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, राहुल गवळी, बाळासाहेब अकोलकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
तनपुरे म्हणाले, तांत्रिक पूर्तता नसताना योजना कशी व कोणी ताब्यात घेतली. लोकांकडून कररूपाने जमा होणाऱ्या पैशांतून विकासकामांना निधी मिळतो. तो जर सत्कारणी लागणार नसेल तर याकडे गांभीर्याने पहावे लागेल. निश्चित आकडेवारी सांगता येत नाही. वीज पंपाची सद्यस्थिती माहीत नाही. पाण्याचे मीटर, विजेचे मीटर अद्ययावत नाही. लिकेज कोठे, बेकायदा नळजोड कोठे, जलवाहिनी कोठे फोडली याची माहिती नाही. यंत्रणा काय करते, अशा शब्दात तनपुरे यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
यावेळी बोलताना संभाजी पालवे, मनसेचे अविनाश पालवे, अमोल वाघ आदींनी चर्चेत भाग घेतला. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांनी स्वागत केले. गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांनी आभार मानले.
---
गुन्हा दाखल करताना पक्ष पाहू नका..
प्रत्येक आठवड्याला योजनेविषयीचा अहवाल पंचायत समिती प्रशासनाने सादर करावा. बेकायदा नळजोड असतील तर काढून घ्या. तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो. अगदी आमच्या पक्षाचा कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल झाल्यावर मंत्री म्हणून मी कुठल्याही अधिकाऱ्याला आडकाठी करणार नाही, असे तनपुरे यांनी सांगितले.
260621\1850-img-20210626-wa0032.jpg
फोटो - मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आढावा प्रकरणी लाभ क्षेत्रातील गावांचे ग्रामसेवक, सरपंच,गटविकास अधिकारी शितल खिंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, काशिनाथ लवांडे, शिवशंकर राजळे, माजी सभापती संभाजी पालवे,एकनाथ आटकर, पुरुषोत्तम आठरे, गोकुळ दौंड आदी उपस्तित होते.