अहमदनगर : पोलिसांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने माजी आमदारअनिल राठोड यांच्याविरोधात शनिवारी (दि. २) तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी याबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी अनिल राठोड यांच्यावर तडिपारीचा प्रस्ताव तयार केल्याने अनिल राठोड यांनी ३० जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन ‘पोलिसांनी पैसे घेऊन माझ्याविरूद्ध तडिपारीचा प्रस्ताव तयार केला’, असा आरोप केला होता. त्यामुळे कोतवालीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक (सध्या संगमनेर येथे निरीक्षक) अभय परमार यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
घनशाम पाटील, अक्षय शिंदे, अभय परमार हे अधिकारी भ्रष्ट आहेत. पोलीस अधिकारी अक्षय शिंदे व परमार यांनी समोरच्या पार्टीकडून पैसे घेतल्यानेच त्यांच्याकडून कामात हलगर्जीपणा झाला. शिंदे व परमार यांची त्यामुळेच हकालपट्टी झाली, असे राठोड म्हणाले. या त्यांच्या वक्तव्यामुळे माझी बदनामी, असे परमार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, राठोड यांच्यावर पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला असून त्याबाबत प्रशासनाकडे सुनावणी सुरू आहे. ही हद्दपारीची कारवाई पोलिसांकडून थांबली जावी, याकरिता राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आपण कोणताही पक्षपातीपणा केला नसताना राठोड यांनी आपणावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. यातून माझी व पोलिसांची समाजात मानहानी झाली, असे परमार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी अधिनियम १९२२चे कलम ३, भादंवि ५०० प्रमाणे राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.