अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यातील परिस्थिती चिघळली आहे. त्यामुळे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. प्रवरासंगम येथील पुलाचे आम्ही ‘काकासाहेब शिंदे पूल’ असे नामकरण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘पंढरपूरला मराठा आंदोलक हे वारीत साप सोडणार होते. त्यामुळे आपण पंढरपूरला गेलो नाही,’ असे वक्तव्य फडणवीस यांनी केले. हे वक्तव्य चिथावणीखोर आहे. मुख्यमंत्र्यांना असा गोपनीय अहवाल कोणत्या पोलीस अधिकाºयाने दिला ? की त्यांनी स्वत:च हा अहवाल तयार केला? याचा खुलासा त्यांनी राज्यासमोर करावा. वारकरी हे शेतकरी आहेत. त्यांना त्रास होईल अशी कृती कधीही मराठा बांधव करणार नाहीत. तरीदेखील फडणवीस यांनी जाणीवपूर्वक असे भडकावू वक्तव्य केले. साप सोडणे ही बहुजन समाजाची संस्कृती नाही. राष्टÑीय स्वयंसेवक संघात ही विकृती आहे. संघाचे कार्यकर्तेच वारीत घातपात घडविणार होते अशी आमची माहिती आहे. त्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पंढरपूरच्या सुरक्षेवर लक्ष ठेऊन होतो.फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे राज्यात हिंसाचार उफाळला आहे. त्यामुळे त्यांना अटक करावी. राज्यपालांनी हस्तक्षेप करुन त्यांचा राजीनामा घ्यावा. उद्या खासदार, आमदार यांच्या घरांवर आंदोलनकर्ते चालून गेले तर आणखी परिस्थिती चिघळेल. मराठा समाजाच्या आमदार, खासदार यांनीही पदांचे राजीनामे देऊन समाजासोबत यावे अशी मागणीही आखरे यांनी केली. पत्रकार परिषदेला कोषाध्यक्ष संतोष गाजरे, संभाजी ब्रिगेडचे नेते राजेश परकाळे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष टिळक भोस, पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष संगीता चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाळुंज, जिल्हा सचिव राजेंद्र राऊत, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष युवराज चिखलठाणे, वीर भगतसिंग परिषदेचे अध्यक्ष शुभम काकडे, अच्युत गाडे, गणेश गायकवाड यांची उपस्थिती होती.त्या पुलाला ‘काकासाहेब शिंदे’ यांचे नाव देणार कानडगाव (ता. गंगापूर जि.औरंगाबाद) येथील ज्या गोदावरीच्या पुलावरून काकासाहेब शिंदे यांनी उडी घेत जलसमाधी घेतली. त्या पुलाचे नामकरण ‘स्मृतिशेष काकासाहेब शिंदे पूल’ असे करण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आखरे यांनी जाहीर केले.
राज्यपालांनी हस्तक्षेप करुन मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा : संभाजी ब्रिगेडची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 1:45 PM