राहुरी : मुळा धरणातील विषारी मासेमारीप्रकरणी मंत्रालयातून सूत्रे हलल्यानंतर मुंबई येथील मे. ब्रिज फिशरिजचे प्रमुख मोहमद बिलाल खान यांच्याविरूध्द गुरूवारी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठवित पाठपुरावा केला होता.‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर मंत्रालयातून सूत्रे हलल्यानंतर उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे़ मुळा पाटबंधारे खात्याचे उपविभागीय अभियंता एऩ बीख़ेडेकर यांनी यासंदर्भात बिलाल खान यांच्याविरूध्द फि र्याद दिली. त्यानुसार गुरूवारी भादंवि ३२८ व १८८ नुसार राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस आधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे़ मे़ ब्रिज फिशरिजला १ जुलै २०१७ ते ३० जून २०१८ या कालावधीत मच्छिमारीसाठी ठेका दिला होता. ठेकेदार मोहमद खान याने ठरवून दिलेल्या अटी व नियमांचे पालन केले नाही़ मुळा पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी मुळा जलाशयाची पाहणी केली़ पाहणीत विषारी औषधांचा वापर केल्याचे उघड झाले होते़भातामध्ये विषारी औषध टाकून मच्छिमारी करण्यात येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते़ त्यानंतर मंत्रालयाने दखल घेऊन चौकशी समितीची स्थापना केली होती.ठेकेदाराच्या अटकेची प्रतीक्षामुळा पाटबंधारे विभागाने याबाबत २५ मे रोजी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला होता़ परंतु हा अर्ज रेकॉर्डला न घेतल्याने त्यामुळे गुन्हा उशिराने दाखल झाला़ विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा केला होता़ विषारी मासेमारीप्रकरणी ठेकेदाराला अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.