चंद्रकांत शेळके, अहमदनगर : शासनाने जाहीर केल्याप्रमाणे जिल्हा परिषद, मनपा व कटक मंडळातील सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश व बूट-पायमोजे मिळणार आहेत. गेल्या १५ दिवसांपासून रखडलेला निधी अखेर शासनाने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाकडे वर्ग केला आहे. हा निधी रखडल्याबाबत तीन दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेमधून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या सर्व मुली तसेच अनुसूचित जाती-जमातींची सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो. सद्य:स्थितीत संबंधित शाळांमधील केवळ दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळत नव्हता. या विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेश योजना लागू करण्यासह एक जोडी बूट, दोन जोडी पायमोजे देण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. ६ जुलैला त्याबाबत शासन निर्णयही निघाला. परंतु यात केवळ नियमित पात्र विद्यार्थ्यांनाच गणवेश मिळाला होता. दारिद्र्यरेषेवरील विद्यार्थी गणवेशापासून वंचित होते. शिवाय बूट व पायमोजांसाठी निधी आलेला नव्हता.
दि. २२ रोजी लोकमतने वृत्त प्रकाशित करून दारिद्र्यरेषेवरील विद्यार्थी गणवेशापासून तसेच बूट, मोजापासून वंचित असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर दोनच दिवसांत म्हणजे सोमवारी (दि. २४) शासनाने गणवेश व बूट-मोजेसाठी नगर जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा विभागाकडे ८ कोटी ३९ लाखांचा निधी वर्ग केला आहे. आता हा निधी येत्या दोन-तीन दिवसांत संबंधित गटविकास अधिकाऱ्यांकडे वर्ग होणार आहे. तेथून प्रत्येक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीला हा निधी मिळणार आहे.१७० रुपयांत बूट खरेदी कशी करणार?
गणवेशाप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बूट आणि पायमोज्यांचे दोन जोड खरेदी करण्यासाठी प्रतिविद्यार्थी १७० रुपये निधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे. परंतु महागाई लक्षात घेता १७० रुपयांत बूट व मोजे खरेदी कसे करायचे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.उर्वरित ७० हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश
आधीच्या गणवेश योजनेनुसार एकूण एक लाख ५९ हजार विद्यार्थ्यांना गणवेश दिलेला आहे. आता उर्वरित दारिद्र्यरेषेवरील ७१ हजार विद्यार्थ्यांना गणवेशाच्या दोन जोडी घेण्यासाठी चार कोटी ३१ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांकडे गणवेश होणार आहे.२ लाख ३० हजार जणांना मिळणार बूट
जिल्हा परिषद, मनपा व कटक मंडळातील पहिली ते आठवी अशा दोन लाख ३० हजार विद्यार्थ्यांना बूट व पायमोजे मिळणार आहेत. त्याचा निधी वर्ग झाला आहे.