शेवगाव : खासगी जागेत भरणाऱ्या शेवगावच्या आठवडेबाजाराच्या स्थलांतराचा अखेर पेच मिटला असून लवकरच नवीन जागेत स्थलांतर करण्यात येणार आहे. आठवडे बाजार स्थलांतराविषयी बुधवारी ( दि.१० ) नगर परिषद कार्यालयात दुपारी बारा वाजता अधिकारी व देवस्थानचे विश्वस्त यांच्यात बैठक पार पडली आहे. खंडोबामाळ येथे पुढील महिन्यात बाजार स्थलांतरित करण्यात येणार आहे.
‘जागेअभावी शेवगावचा आठवडे बाजार रस्त्यावर' या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करून ‘लोकमत’ने नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर प्रशासनाने आठवडे बाजाराचे स्थलांतर केले.
बुधवारच्या बैठकीत प्रशासक तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून नितीन बनसोडे, खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष छबुराव मिसाळ यांच्यासह सर्व विश्वस्त उपस्थित होते.
देवस्थान ट्रस्टच्या अटी शर्तींवर चर्चा होऊन प्रशासन व देवस्थान विश्वस्त यांच्यात एकमत होऊन देवस्थानच्या मालकीची जागा आठवडे बाजारासाठी देण्याचे ठरले आहे. याबाबत लवकरच लेखी करार होऊन नंतर पुढील महिन्यात आठवडे बाजारचे स्थलांतर होणार आहे.
शेवगाव येथील आठवडे बाजार शहराच्या मध्यवस्तीत बसस्थानकापासून अवघ्या काही अंतरावर इनामदार यांच्या खासगी जागेत भरतो. बाजारासाठी सदरची जागा अपुरी पडू लागण्याने व्यापारी यांनी थेट नेवासा रस्ता, मिरी रस्त्यावरच शेतमाल विक्री करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे ती दुकाने रहदारीला मोठा अडथळा ठरत आहेत. तसेच अवघ्या काही अंतरावर बसस्थानक असल्याने स्थानकात मंडळाच्या गाड्यांच्या दिवस भरातील ४५० फेऱ्या, नेवासा, नगर, मिरी, पैठण, पाथर्डीकडे जाणारी वाहतूक यामुळे वाहतूक कोंडी होते आहे.
यावर ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पुढील महिन्यात आठवडे बाजार खंडोबामाळ येथे भरणार असल्याने होणारी वाहतूक कोंडी सुटणार असून बाजारात माल विक्रीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध होणार आहे.