केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथे ग्रामस्थांच्या विरोधानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत कोविड केअर सेंटर सुरू केले.
जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १६ गावांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जेऊर गावामध्येही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या परिसरात कोविड सेंटर सुरू करण्याबाबत पंचक्रोशीतील नागरिकांनी मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने जेऊर परिसरातील विविध शाळा, महाविद्यालयांची पाहणी करण्यात आली. दहावी, बारावीचे वर्ग सुरू असल्याने सेंटरसाठी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवडण्यात आली.
प्राथमिक शाळा गावातील मध्यवस्तीत असल्याने स्थानिक नागरिकांनी येथे कोविड सेंटर होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला. परंतु, प्रशासनाने कठोर भूमिका घेत येथे कोविड सेंटर सुरू केले आहे. कोविड सेंटर सुरू झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. ७५ बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
याप्रसंगी तहसीलदार उमेश पाटील, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे, मंडळाधिकारी वृषाली करोसिया, ग्रामविकास अधिकारी सविता लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कर्डिले, डॉ. सुप्रिया थोरबोले, तलाठी आगळे, इमामपूर सरपंच भीमराज मोकाटे, भाजप तालुका उपाध्यक्ष राजेंद्र दारकुंडे, डोंगरगण माजी सरपंच कैलास पटारे उपस्थित होते.