प्रथम वर्ष स्मृतीनिमित्त कीर्तन, भोजन आदी कुठलाही जास्त खर्च न करता अत्यंत वेगळ्या पद्धतीने गुरुजींना आदरांजली वाहिली. कोणतीही गर्दी न करता कोरोना काळात इतरांसाठी एक आदर्श घालून दिल्याने हा एक स्तुत्य उपक्रम ठरला आहे. नानासाहेब वाक्चौरे गुरुजी गणोरे पंचक्रोशीतील अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक, सेवाभावी व आदर्श शिक्षक होते. नोकरी करीत असतानाच ते पंचक्रोशीतील अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे डी. एड.चे फॉर्म प्रत्येक जिल्ह्यात जाऊन स्वखर्चाने भरत असत. त्यातील अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षक म्हणून सेवा करीत आहेत.
नानासाहेब वाक्चौरे गुरुजी दरवर्षी परिसरातील पाच गरजू मुलांना कपडे, शैक्षणिक साहित्य देत मदत करायचे. कुणाला कशाची गरज लागू स्वतः खर्च करीत गरजू, गरीब विद्यार्थ्यांना आधार द्यायचे. हे व्रत वाक्चौरे गुरुजींनी जीवनभर पाळले होते. विद्यार्थ्यांबरोबरच अनेक गरजू नातेवाइकांना कठीणप्रसंगी वेगवेगळ्या पद्धतींनी मदत करून त्यांना आधार देण्याचे काम गुरुजींनी आयुष्यभर केले. मागील वर्षी अचानक अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुजींचा स्मृतिदिन त्यांच्या परिवाराने कृतिशील पद्धतीने साजरा करीत सामाजिक बांधीलकी जपली. वडिलांची स्मृती त्यांनी शैक्षणिक, सामाजिक संस्थांना मदत करीत कृतिशील पद्धतीने साजरी करीत पंचक्रोशीत आदर्श निर्माण केला आहे.